श्रीनगरमध्ये देवगड कॉलेजच्या ढोल नृत्याचा डंका

‘आरोहण’ राष्ट्रीय युवा महोत्सवात बहारदार सादरीकरण
कलाकारांनी जिंकली रसिकांची मने
जम्मू आणि काश्मीर प्रशासनाच्या ‘युवा सेवा आणि क्रीडा संचालनालयाच्या वतीने श्रीनगर येथे झालेल्या ‘आरोहण’ या राष्ट्रीय युवा महोत्सवात देवगडच्या स. ह. केळकर महाविद्यालयाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ढोल नृत्य सादर करून देशभरातून आलेल्या स्पर्धकांची आणि नृत्य रसिकांची मने जिंकली. अलीकडेच ११ ते १३ मे या कालावधीत श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र अर्थात SKICC येथे हा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये देशभरातील ११ राज्यातील संघ सहभागी झाले होते.
देवगडच्या स. ह. केळकर महाविद्यालयाने यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात हेच ढोल नृत्य सादर केले होते. अंतिम फेरीत या ढोलनृत्याने सुवर्ण पदक मिळवून इतिहास घडविला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एखाद्या महाविद्यालयाने अंतिम फेरीत लोकनृत्य कला प्रकारात मिळविलेले अशाप्रकारचे हे पहिलेच यश होते.
मुंबईचे भूषण पाटील हे या नृत्याचे मुख्य प्रशिक्षक. सिंधुदुर्गातील सागर सारंग आणि रोहित माने यांनी या ढोल नृत्याचे धडे भूषण पाटील यांनी फार पूर्वीच घेतले होते. सागर सारंग आणि रोहित माने यांच्या गृप द्वारे जिल्ह्यात आणि जिल्हाबाहेर झालेल्या अनेक स्पर्धात या ढोल नृत्याने प्रचंड यश मिळविले. हेच नृत्य देवगड कॉलेजच्या वतीने बसविण्यासाठी सागर सारंग आणि रोहित माने यांना बोलविण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांची ऑडिशन घेऊन त्यातून दहा विद्यार्थी निवडून या लोकनृत्याची तालीम सुरू केली.
हे नृत्य ठाणे-पालघर जिल्ह्यात जव्हार-मोखाडा या आदिवासी भागात केले जाते. ढोल आणि पत्र्याच्या डब्याच्या तालावर वेगवेगळ्या मजेशीर गाण्यांचा आधार घेत पायात घुंगरू बांधून मद्यधुंद अवस्थेत पुरुष मंडळी हे नृत्य सादर करतात. नृत्य करताना केले जाणारे विविध मनोरे हे या लोकनृत्याचे प्रमुख वैशिष्ट्य. अतिशय अवघड असे हे ढोल नृत्य सागर सारंग, रोहित माने यांनी भूषण पाटील यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांकडून बसवून घेतले. यासाठी अतिशय मेहनतीने तालीम करण्यात आली. प्रत्येक दिवशी सुरुवातीला वॉर्मअप झाल्यानंतर 15 ते 18 वेळातरी पूर्ण तालीम केल्या जायच्या.
अर्थात याचे फळ त्यांना मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सुवर्णपदकाच्या रूपाने मिळाले. पण राष्ट्रीय पातळीवर आपली कला दाखवून अव्वल ठरण्याची या कलाकारांची मनीषा होती. अशा स्पर्धेत त्यांनी भाग सुद्धा घेतला होता. पण त्या स्पर्धेत दुर्दैवाने दुसऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावे लागले. सर्व कलाकार आणि प्रशिक्षक यामुळे खूप निराश झाले. पण केलेली मेहनत फुकट जात नाही असे म्हणतात. त्याप्रमाणे देवगड कॉलेजला श्रीनगर येथे होणाऱ्या ‘आरोहण’ या राष्ट्रीय युवा महोत्सवात ढोल नृत्य सादरीकरणाचे निमंत्रण मिळाले. त्या महोत्सवात देवगड कॉलेजचे हे ढोलनृत्य महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत होते.
हातात वेळ कमी होता तरी देखील पुन्हा जोमाने तालमी करून हे कलाकार श्रीनगर येथे पोहोचले. श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र अर्थात SKICC च्या क्रीडा संकुल हॉल मध्ये ढोल नृत्य सादर करण्यात आले. या नृत्याला सर्व रसिकांचा आणि देशभरातून आलेल्या इतर कलाकारांचा अतिशय उदंड प्रतिसाद मिळाला. तिथल्या रसिकांनी तर या नृत्याच्या तालावर आपल्या जागी ठेका धरला होता. देवगड कॉलेजच्या या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते पदक, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या नृत्यामध्ये साहिल दीपक जाधव, तनिष हिरोजी नाईक, साहिल दिलीप जाधव, अभिषेक चारुदत्त शिंदे, भावेश हर्ष डेगवेकर, रितेश संदीप धुरी, करण मंगेश मेस्त्री, साईनील सुनील धुरे, योगीराज चंद्रशेखर नार्वेकर, प्रफुल प्रकाश हजारे आणि शिवमणी अजय पाळेकर हे कलाकार सहभागी झाले होते. ८ कलाकार प्रत्यक्ष नृत्यामध्ये तर दोघे वादक आणि गायक कलाकार होते. या सर्वांना शिक्षण विकास मंडळ संचलित, श्री. सदाशिव हरी केळकर, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, महाविद्यालय देवगडचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितीन वळंजू यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून सिंधुदुर्गच्या या युवा कलाकारांनी जम्मू काश्मीर मध्ये आपल्या कलेची जी मोहोर उमटवली ती निश्चितच कौतुकास्पद आहे.





