मुंबई उच्च न्यायालयाच्या विवाह समुपदेशक परीक्षेत सिंधुदुर्गचा लौकिक

नंदकिशोर फोंडेकर आणि ऍड. रोहन शारबिद्रे यांचे यश
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या “विवाह समुपदेशक” (राजपत्रित अधिकारी गट-अ) या पदाच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. फोंडाघाट गावचे सुपुत्र नंदकिशोर रामदास फोंडेकर यांनी महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक, तर कुडाळ तालुक्यातील सुपुत्र ऍड. रोहन सदानंद शारबिद्रे यांनी बारावा क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळविले आहे.
सदरची पदभरती प्रक्रिया ही मुंबई उच्च न्यायालयामार्फत राबविण्यात आली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





