देशव्यापी औषध विक्रेते बंद यशस्वी

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात १२ लाख विक्रेत्यांचा एल्गार

देशभरातील औषध विक्रेत्यांनी पुकारलेला एकदिवसीय देशव्यापी बंद काल मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. कॉर्पोरेट कंपन्यांच्या वाढत्या एकाधिकारशाहीविरोधात तसेच केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात देशभरातील जवळपास १२ लाख औषध विक्रेते या आंदोलनात सहभागी झाले होते.
हा बंद केवळ व्यापारी हितासाठी नसून, देशातील कोट्यवधी रुग्णांचे आरोग्य, लाखो किरकोळ व्यापाऱ्यांचे अस्तित्व आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
औषध विक्रेत्यांच्या मते, ऑनलाईन औषध विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडत असून, नियमांचे उल्लंघन करून अनैतिक डिस्काउंट वॉर सुरू आहे. ग्राहकांना २० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलती देताना बोगस औषध विक्री, डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे पुरवणे आणि नकली चिठ्ठ्यांच्या आधारे विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे अँटीबायोटिक्स, झोपेच्या गोळ्या, पेनकिलर्स आणि काही कफ सिरप्सचा गैरवापर वाढत असल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पडताळणीचा अभाव असल्याने Schedule H आणि Schedule X अंतर्गत येणारी औषधे सहज उपलब्ध होत असून त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या गर्भपाताच्या गोळ्यांचीही ऑनलाईन बेकायदेशीर विक्री होत असल्याचा आरोप संघटनांनी केला. डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय अशा औषधांचा वापर महिलांसाठी धोकादायक ठरू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
औषध विक्रेत्यांनी केंद्र सरकारवरही गंभीर आरोप केले आहेत. ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भात कठोर कायदे करण्यात सरकार अपयशी ठरल्याने गैरप्रकारांना चालना मिळत असल्याचा आरोप करण्यात आला.
भारतीय औषध उद्योगाची वार्षिक उलाढाल सध्या सुमारे ₹४.७२ लाख कोटी असून २०३० पर्यंत हा बाजार ₹११ लाख कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या या क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
देशभरातील १ कोटीहून अधिक कुटुंबे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे औषध व्यवसायावर अवलंबून असल्याने या क्षेत्रातील बदलांचा रोजगार आणि सार्वजनिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

error: Content is protected !!