कुडाळ पं. स. मध्ये शेळीपालन विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न

कुडाळ पं. स. मध्ये २० मे या पशुसंवर्धन दिनाच्या औचित्याने “ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली अर्थात किफायतशीर शेळीपालन” या विषयावरचे मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
पंचायत समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती मिलिंद नाईक उपस्थित होते. यावेळी बोलताना सभापती मिलिंद नाईक यांनी शेळीपालन हा ग्रामीण भागातील शेतकरी व बेरोजगार युवकांसाठी कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याचे सांगितले. शेळीपालनातून दुग्ध व्यवसाय, खत निर्मिती तसेच पूरक उत्पन्नाचे प्रभावी साधन निर्माण होत असून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यास मोठी मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच आधुनिक पद्धतीने शेळीपालन, योग्य जातींची निवड, लसीकरण, संतुलित आहार व आरोग्य व्यवस्थापन याबाबत तज्ज्ञांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध पशुसंवर्धन योजनांचा लाभ घेऊन युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी सभापती मिलीम नाईक यांच्यासह उपसभापती सिताराम तेली, पंचायत समिती सदस्य दीप्ती नाईक, गटविकास अधिकारी मनोज भोगटे, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर अभिजीत कसालकर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास शेतकरी, महिला बचतगट सदस्य, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





