कुणकवळे येथे १६ वा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा; विविध कार्यक्रमांची रेलचेल

छू मंतर’ नाटकाची रंगणार मेजवानी
दोन दिवस रंगणार भक्ती, संस्कृती आणि मनोरंजनाचा संगम
मालवण तालुक्यातील कुणकवळे येथील श्री दुर्गादेवी मंदिराचा १६ वा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा दिनांक १८ व १९ मे २०२६ रोजी विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. श्री दुर्गादेवी मंदिर देवस्थान मंडळ, मुंबई व श्री दुर्गादेवी मंदिर देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, १८ मे रोजी सकाळी देवीची पूजा, दुर्गा सप्तशती पाठ, महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा, सायं आरती तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवार, १९ मे रोजी सकाळी दुर्गाभिषेक, सामुदायिक दुर्गाभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती, महाप्रसाद तसेच भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्धापन दिन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणून मंगळवार, १९ मे रोजी रात्री ९.३० वाजता श्री दुर्गादेवी नाट्यमंडळ कुणकवळे यांच्याकडून ‘छु मंतर’ हे दोन अंकी धमाल विनोदी नाटक सादर करण्यात येणार आहे. नाटकाचे लेखन वसंत कानेटकर यांचे असून दिग्दर्शन महेश अंकुश तारी यांनी केले आहे.
या नाटकात सुरेंद्र गावडे, निखिल बागवे, संदीप सावंत, सुशील बागवे, गौरव गावडे, सागर नलावडे, श्रेया दळवी, प्रणाली कासले, मिताली आचरेकर तसेच सिनेअभिनेता प्रविण प्रताप देसाई हे कलाकार भूमिका साकारणार आहेत. स्थानिक कलाकारांच्या सहभागामुळे नाटकाबाबत परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाविकांनी व ग्रामस्थांनी या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.





