नीट (NEET) परीक्षा घोटाळ्यातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजू शेट्टी यांची मागणी

NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील घोटाळ्यामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असून, या धक्क्यातून देशातील चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना अत्यंत दुर्दैवी असून, ही केवळ आत्महत्या नसून सरकारी अनास्थेमुळे झालेली हत्या असल्याची तीव्र प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रकरणातील संबंधित अधिकारी, दलाल आणि संस्थाचालकांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या काही दिवसांत सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि कोकण भागातील विद्यार्थ्यांचे पालक व परीक्षार्थी यांची भेट घेतली असता त्यांच्यात प्रचंड नैराश्य आणि अस्वस्थता दिसून आली. डॉक्टर होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गरीब व मध्यमवर्गीय पालकांनी आयुष्यभराची कमाई खर्च केली आहे.
अनेक पालकांनी शेतजमीन विकली, तर काहींनी घरे गहाण ठेवून किंवा विकून मुलांच्या शिक्षणासाठी आणि कोचिंगसाठी पैसे उभे केले. मात्र पेपरफुटी आणि गुणांतील गैरव्यवहारामुळे मेहनती व पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून, पैशाच्या जोरावर प्रवेश मिळत असल्याने प्रामाणिक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र मानसिक तणाव निर्माण झाला आहे.
पेपरफुटीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा काळाबाजार होत आहे. शासकीय गोपनीय माहिती, परीक्षांचे नियोजन आणि कंत्राटांची माहिती दलालांपर्यंत आधीच कशी पोहोचते, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला.
सरकारमधील काही यंत्रणा भ्रष्ट आणि बरबटलेल्या असल्यामुळेच असे प्रकार घडत असल्याची टीका करत, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

error: Content is protected !!