माणगावमधील ‘समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

५०० हून अधिक नागरिकांची कामे मार्गी

महसूल विभागाच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक

​सामान्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि प्रशासकीय कामे गतिमान व्हावीत, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना’ला माणगाव येथे मोठा प्रतिसाद मिळाला. कुडाळ तहसील कार्यालयामार्फत माणगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी झालेल्या भव्य ‘समाधान शिबिरा’चा ५०० हून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
राज्य शासनाच्या ‘महाराजस्व अभियान टप्पा १’ अंतर्गत हे शिबिर पार पडले. यामध्ये महसूल विभागाशी संबंधित तब्बल १४ प्रमुख सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील त्रुटी दुरुस्ती (कलम १५५), डिजिटल ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी शालेय दाखले, उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रांचे जागीच वाटप करून दिलासा देण्यात आला.
शासन नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. सामान्यांची कामे वेळेत, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने व्हावीत हाच या अभियानाचा मुख्य हेतू आहे. नागरिकांनी अशा शिबिरांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन यावेळी कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी केले.
शिबिरात संजय गांधी निराधार योजना, पी. एम. किसान योजना, आयुष्मान भारत कार्ड आणि नवीन शिधापत्रिकेची कामे प्राधान्याने निकाली काढण्यात आली. विशेष म्हणजे, तळीगाव येथील पारधी कुटुंबांच्या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न महसूल विभागाने अवघ्या महिनाभरात मार्गी लावल्याबद्दल संबंधित ग्रामस्थांनी प्रशासनाचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.
जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर व रुपेश कानडे यांनी कुडाळ महसूल विभागाच्या या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे तोंडभरून कौतुक केले. माणगाव सरपंच मनिषा भोसले यांनीही महसूल मंडळाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. ​यावेळी पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, सौ. घावनळकर, तसेच कालेली, वाडोस, नानेली व घावनळे गावचे सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी केले. त्यांनी या अभियानाचा उद्देश आणि त्यातून होणारा लोकांचा फायदा विशद केला. आभार प्रदर्शन माणगाव मंडळ अधिकारी श्रीमती कदम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्राम महसूल अधिकारी माणगाव सुशांत पाटील, कट्टागाव अश्विनी दराडे, खुटवळ वाडी अनिलकुमार बतलवाड यांचा मोलाचा सहभाग होता.

error: Content is protected !!