कोकणच्या सुपुत्राचा भाजपकडून गौरव

विनोद तावडे यांच्या सत्काराने कणकवलीत जल्लोष
भाजपा सिंधुदुर्गकडून विनोद तावडे यांचे स्वागत
राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय विनोदजी तावडे यांचा भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने प्रहार भवन, कणकवली येथे भव्य स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या हस्ते विनोदजी तावडे यांचा सत्कार करण्यात आला.
कोकणचे सुपुत्र असलेले विनोदजी तावडे यांनी पक्ष संघटनेत राष्ट्रीय पातळीवर प्रभावी नेतृत्व करत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या यशात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे.
तावडे साहेबांच्या रूपाने कोकणाला राज्यसभेतील प्रभावी प्रतिनिधित्व लाभले असून, यामुळे कोकणाच्या विकासाला नवी दिशा आणि अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कोकणातील लोकप्रतिनिधी विविध स्तरांवर सक्षमपणे कार्यरत असल्याने विकासाची नवी दारे खुली होतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





