वालावल ते कवठी रस्त्याची झालेली दुर्दशा

१२ मे रोजी वालावल येथे रास्ता रोको
पं. स. सदस्य अर्चना बंगे यांचा इशारा
वालावल ते कवठी पर्यंत रस्त्याची झालेली दुर्दशा, लोक व वाहानधारकांचे होणारे हाल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत; या बाबत लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. १२ मे रोजी सकाळी ९ वाजता वालावल येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ व जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा वालावल पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
सौ. बंगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वालावल-चेंदवण-कवठी रस्ता एवढा खराब होऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग गप्प का? रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असुन ग्रामस्थांना चालत जाणे कठीण झाले आहे. वाहनधारकांचे कंबरडे मोडे पर्यंत हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. आम्ही रस्त्यावर उतरण्याची वाट बांधकाम विभागाने बघत बसु नये, म्हणून या बाबत लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, नेरुर जिल्हा परिषद शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख शेखर गावडे, उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, युवासेनेचे सुनिल करवडकर, युवासेनेचे विभाग प्रमुख मितेश वालावलकर यांच्या उपस्थितीत रास्तारोको करण्याचा इशारा सौ बंगे यांनी दिला आहे.





