वाढत्या बाजारीकरणाच्या रेट्यात आरोग्य व्यवस्था टिकवण्यासाठी सावध राहावे लागणार

चिपळूणमध्ये ‘डॉक्टर–रुग्ण सुसंवाद’ विषयावर व्याख्यान

मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवरील हिंसेचे प्रमाण वाढत आहे. यासाठी वैद्यकीय व्यवसायातील वाढते बाजारीकरण जबाबदार आहे. मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये परकीय गुंतवणूक वाढत (ट्रान्स नॅशनल इन्व्हेस्टमेंट) आहेत. या वाढत्या बाजारीकरणाचा परिणाम फक्त रुग्णालय किंवा रुग्णावर होत नसून, त्याचा विपरीत परिणाम पूर्ण समाजावर होत आहे. त्यामुळे लहान खासगी हॉस्पिटल आणि सरकारी आरोग्य व्यवस्था टिकवण्यासाठी आपल्याला सावध राहावे लागणार आहे. असे मत सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ.अभय शुक्ला यांनी व्यक्त केले.

चिपळूण सिटीझन डॉक्टर फोरम (CCDF) यांच्या वतीने “हिंसा आणि बाजारीकरणाच्या पलीकडे : डॉक्टर–रुग्ण सुसंवादाची दिशा” या विषयावर पहिले व्याख्यान गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृह, चिपळूण येथे संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन चिपळूण सिटीझन डॉक्टर फोरमने केले होते. या फोरममध्ये चिपळूण नगरपरिषद, शासकीय आरोग्य विभाग, खासगी डॉक्टर संघटना, अनुसंधान ट्रस्ट- साथी आणि रुग्ण हक्क समिती सक्रीय आहेत.

डॉ.अभय शुक्ला यांनी आपल्या व्याख्यानात आरोग्य क्षेत्रातील वाढते बाजारीकरण, डॉक्टर–रुग्ण नात्यात निर्माण होणारे ताणतणाव आणि त्यावर सुसंवादाच्या माध्यमातून कशी सकारात्मक दिशा देता येईल, याबाबत सविस्तर मांडणी केली. वैद्यकीय व्यवसायातील हिंसेला मुख्यत: संवादातील अडचणी, अपेक्षांमधील तफावत आणि बिलांसंदर्भातील वाद इ. कारणे आहेत. यासाठी विश्वास, संवाद कौशल्य, बिलातील पारदर्शकता आणि आणि परस्पर आदर या मूल्यांवर आधारित नातेसंबंधाची गरज व्यक्त केली. तसेच शासनाची सक्रिय तक्रार निवारण यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे, मत डॉ. अभय शुक्ला यांनी मांडले.

यावेळी बोलताना चिपळूण आय.एम.ए.अध्यक्ष डॉ.अब्बास जबले यांनी ‘डॉक्टरांच्या हातात फक्त स्टेथोस्कोप नाही, तर रुग्णाचा जीव असतो. त्यामुळे डॉक्टर-रुग्णाचे नाते व्यवहाराचे नाही, तर विश्वासाचे आहे. जिथे चांगला संवाद, तिथे चांगला उपचार होतो. त्यामुळे डॉक्टर व रुग्ण संवाद महत्त्वाचा आहे.’ असे सांगितले.

चिपळूणमध्ये २०२४ पासून ‘अनुसंधान ट्रस्ट – साथी, पुणे’ यांच्या माध्यमातून रुग्ण हक्क आणि जबाबदाऱ्या या विषयावर सातत्याने उपक्रम राबवले जात असून, त्यातूनच ‘चिपळूण सिटीझन डॉक्टर फोरम’ची स्थापना झाली आहे. या फोरमच्या माध्यमातून पुढील काळातही अशा संवादात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सुनिता गांधी यांनी सांगितले.

यावेळी शकुंतला भालेराव यांनी प्रस्तावना करताना, बदलत्या राजकीय, सामाजिक वातावरणात ‘सिटीजन डॉक्टर फोरम’ची गरज विशद केली. डॉक्टर व रुग्ण यांच्यातील संवाद वाढावा, यासाठी असे फोरम गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती जाधव व ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विजय कांबळे उपस्थित होते.

चर्चा सत्रात उपस्थित डॉक्टर, नागरिक आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेत विविध मुद्यांवर चर्चा केली. या संवादातून डॉक्टर–रुग्ण नाते अधिक मजबूत आणि सकारात्मक करण्यासाठी सहकार्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

अधिक माहितीसाठी संपर्क- शकुंतला भालेराव – 9850254679, सुनिता गांधी- 7218894823

error: Content is protected !!