प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती जागृत होणे आवश्यक — अर्जुन चांदेकर

आचरा येथे ‘सकल हिंदू संमेलन’ उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न
समाजात मोठ्या प्रमाणात सज्जनशक्ती अस्तित्वात आहे मात्र ती एकत्र येणे आवश्यक आहे. जातीभेद, भाषाभेद आणि वैयक्तिक स्वार्थ यामुळे समाज विखुरलेला दिसतो. ही दरी दूर करून सर्वांनी ‘आपण एक आहोत’ ही भावना जोपासली पाहिजे. भारत देश पूर्वी वैभवसंपन्न व शक्तिशाली होता; मात्र आत्मकेंद्रित वृत्ती, विस्कळीतपणा आणि राष्ट्रीय भावनेचा अभाव यामुळे समाज कमजोर झाला. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती जागृत होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आचरा दशक्रोशीत हिंदू समाजात ऐक्य, संघटन व जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले ‘सकल हिंदू संमेलन’ प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते अर्जुन चांदेकर (निवृत्त उपमुख्याध्यापक, आर.पी.डी. हायस्कूल सावंतवाडी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक) यांनी केले.
आचरा टेंबली येथील मांगल्य मंगल कार्यालयात सकल हिंदू संमेलन’ उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न झाले. या संमेलनाला आचरा व परिसरातील विविध गावांमधून नागरिक, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेदमूर्ती दत्तात्रय महादेव मुरवणे गुरुजी विराजमान होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सौ. ज्योती बुवा तोरसकर (इतिहास संशोधक व ज्येष्ठ शिक्षिका) उपस्थित होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून अर्जुन यशवंत चांदेकर (निवृत्त उपमुख्याध्यापक, आर.पी.डी. हायस्कूल सावंतवाडी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक) हे उपस्थित होते.
संमेलनाची सुरुवात विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी झाली. रामरक्षा पठण, पंढरपूर वारीचे सादरीकरण, तसेच लाठी-काठीच्या मर्दानी खेळातून हिंदू संस्कृतीचे वैभव आणि परंपरेचे दर्शन घडविण्यात आले. या सादरीकरणांमधून समाजाला एकत्र येण्याचा आणि संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात आला. या संमेलनात समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक सेवा, गड-किल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण (विशेषतः कासव संवर्धन), तसेच इतर सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या माध्यमातून समाजातील ‘सज्जनशक्ती’ची जाणीव करून देण्यात आली.
यावेळी बोलताना प्रमुख वक्ते अर्जुन चांदेकर यांनी आपल्या प्रभावी भाषणात हिंदू समाजाच्या एकतेची गरज अधोरेखित केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, संघाचे मुख्य कार्य म्हणजे संस्कारित व्यक्ती घडवणे. अशा व्यक्ती समाजात जाऊन विविध क्षेत्रांत कार्य करून राष्ट्रनिर्माणात योगदान देतात असे म्हणाले. चांदेकर यांनी आपल्या भाषणात नागरिकांच्या कर्तव्यांवर विशेष भर दिला.
“फक्त हक्कांची मागणी करून चालणार नाही; प्रत्येकाने आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवली पाहिजे. शिस्त पाळणे, वाहतुकीचे नियम पाळणे, स्वच्छता राखणे, पाणी व वीज यांचा योग्य वापर करणे या साध्या गोष्टींमधूनही देशप्रेम दिसून येते,” असे त्यांनी सांगितले. यावेळी संमेलनाच्या माध्यमातून हिंदू समाजाने संघटित होऊन धर्म, देश आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यस्थानी असलेले वेदमूर्ती दत्तात्रय महादेव मुरवणे मार्गदर्शन करताना प्रत्येकाने मानसिक, बौध्दक, शारीरीक दृष्य्य आपण सक्षम असणे आवश्यक असल्याचे विविध दाखले देत सांगितले, आहे. यावेळी डॉ. सौ. ज्योती बुवा तोरसकर (इतिहास संशोधक व ज्येष्ठ शिक्षिका) यांनी धर्मवाढीसाठी स्त्रीची भूमिका कशी महत्वाची आहे हे विविध इतिहासातील घटनांचे संदर्भ देत स्त्रीशक्ती महत्वाची असल्याचे यावेळी नमूद केले. या ऐतिहासिक संमेलनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक संजय मिराशी, अजित आचरेकर, प्रकाश मेस्त्री, मंदार सरजोशी, विवेक परब तसेच सकल हिंदू समाज, आचरा दशक्रोशीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.





