पेट्रोलियम कंपन्यांकडून होतोय अपुरा पेट्रोल-डिझेल पुरवठा

पेट्रोलपंप डीलर असोसिएशनने वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष
सिंधुदुर्ग जिल्ह्याला पेट्रोलियम कंपन्यांकडून होत असलेल्या अपुऱ्या पेट्रोल डिझेल पुरवठ्या बाबत आज रत्नागिरी-सिंधुदुर्ग पेट्रोलपंप डीलर असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. आज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी पेट्रोलियम कंपन्यानचे सुमारे ६० पेट्रोल पंप असून त्यांना मिरज व हजारवाडी येथून पेट्रोल व डिझेल पुरवठा केला जातो. सद्यस्थितीत जिल्ह्यातील पंपाचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेट्रोल वा डिझेलचा तुटवडा वारंवार होत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या रोषाला पेट्रोल पंप चालकाला सामोरे जावे लागत आहे. मुख्यत: डिझेलचा पुरवठा फार कमी होत आहे. याबाबत पेट्रोलियम कंपन्यानंकडून कोणतेही समर्पक उत्तर मिळत नाही. आमचे लोडचे पैसे जमा असताना सुद्धा वा टँकर उपलब्ध असताना सुद्धा काही कारण न देता लोड भरला जात नाही.
सध्या आंबे वाहतूक, मासे व्यवसाय, पर्यटन तसेच शासकीय कंत्राटे ह्याचा हंगाम असल्यामुळे पेट्रोल व डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रामुख्याने डिझेलची मागणी फार वाढली आहे. पण होणाऱ्या अपुऱ्या डिझेल पुरवठ्यामुळे त्याचा परिणाम वरील सर्व व्यवसायावर होत आहे. ह्या सर्वा मुळे पेट्रोल पंप चालक फार हैराण झाला आहेत. तरी आपण पेट्रोलियम कंपन्यांना पेट्रोल व डिझेल पुरवठा सुरळीतपणे करण्या बद्दल आदेश द्यावेत अशी विनंती रत्नागिरी-सिंधुदुर्ग पेट्रोलपंप डीलर असोसिएशनने निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शेखर सावंत आणि पदाधिकारी उपस्थित होते.





