गड-किल्ल्यांची अस्मिता जपा, अन्यथा आंदोलन – सुनील पवार

रायगड किल्ल्यावर झालेले प्री-वेडिंग शूट निंदनीय

गड-किल्ले हे पर्यटन स्थळ नसून, ते आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची साक्ष देणारी पवित्र स्थळे आहेत. या ठिकाणी अत्यंत निंदनीय आणि असंवेदनशील घडणाऱ्या घटनांबाबत आळा न घातल्यास भविष्यात कठोर आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समिती चे अध्यक्ष सुनिल पवार यांनी पत्रकातून दिला आहे.
पत्रकात श्री पवार यांनी म्हटले आहे की रायगड किल्ला हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी व अत्यंत पवित्र स्थळ आहे. याच ठिकाणी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांची समाधी देखील येथेच आहे. त्यामुळे रायगडाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे.
अशा पवित्र ठिकाणी काही दिवसांपूर्वी प्री-वेडिंग शूटिंग झाल्याची घटना समोर आली आहे, जी अत्यंत निंदनीय आणि असंवेदनशील आहे. गड-किल्ले हे पर्यटन स्थळ नसून, ते आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची साक्ष देणारी पवित्र स्थळे आहेत. नियमांनुसार (ASI) परवानगीशिवाय अशा प्रकारचे छायाचित्रण करणे हा गुन्हा आहे. तरीही हा प्रकार कसा घडला, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरुणांनी इतिहासाचा आदर ठेवून वर्तन करावे गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी आहे अशा घटनांना आळा घालणे अत्यावश्यक आहे. अन्यथा भविष्यात कठोर आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा सुनिल पवार यांनी देत गड-किल्ले जपा, इतिहास जपा असे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!