स्वावलंबी भारत अभियानाद्वारे कौशल्यपूर्ण जिल्हा घडविण्याचा संकल्प

कणकवली मध्ये घेतलेल्या बैठकीत निर्णय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवाशक्तीला स्वावलंबनाचे अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी आणि उद्योजकतेचे नवे क्षितिज विस्तारण्यासाठी, स्वावलंबी भारत अभियानाची जिल्हास्तरीय विविध संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक कणकवली येथील हॉटेल उत्कर्षा मध्ये संपन्न झाली. भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष तथा अभियानाचे जिल्हा समन्वयक श्री. सत्यविजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. प्रगतीचा मागोवा आणि भविष्यातील रूपरेषा
या बैठकीत प्रामुख्याने जिल्हा स्तरावरील कार्याचा आढावा, निधी संकलनाचे नियोजन आणि आगामी काळातील उपक्रमांच्या अंमलबजावणीवर सखोल चर्चा करण्यात आली. स्वयंरोजगाराचा इमला उभारण्यापूर्वी कौशल्य विकास हाच त्याचा पाया असला पाहिजे, यावर सर्व उपस्थितांचे एकमत झाले.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कौशल्य विकास विभागाचे साहाय्यक आयुक्त श्री. भैय्यासाहेब येरमे यांनी कौशल्य दीक्षा ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले:
जिल्ह्यातील असंघटित कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांना प्रशिक्षणाद्वारे कौशल्यप्रदान करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे ही आमची कटिबद्धता आहे. कौशल्य विकास विभागामार्फत जिल्ह्यात एक समर्थ आणि प्रगल्भ कामगारवर्ग निर्माण करण्यासाठी आम्ही पूर्णतः सहकार्य करू
विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित असलेले स्वावलंबी भारत अबजियान कोकण प्रांत समन्वयक व स्वदेशी जागरण मंच कोकण प्रांत प्रचार प्रमुख श्री. अनिकेत रवींद्र वालावलकर यांनी स्वदेशी आणि स्वावलंबनाची सांगड घालत उपस्थितांना प्रेरित केले. तसेच, PMFME चे जिल्हा प्रमुख श्री. योगेश वालावलकर यांनी उद्योगांना तांत्रिक, आर्थिक आणि विपणन साहाय्य मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे गोसेवा संयोजक श्री चंद्रशेखर पुनाळेकर, तसेच वैभववाडी तालुका स्वावलंबी भारत अभियान समन्वयक व माजी सरपंच श्री महेश संसारे, तसेच नांदगाव येथील यशस्वी महिला कृषि उद्योजक व कणकवली तालुका सहसमन्वयक सौ ज्योती देसाई उपस्थित होते तसेच स्वामी समर्थ अध्यात्म सेवा मंडळाच्या अनेक स्वामीसेवकांनी स्वदेशीचा जागर करत राष्ट्रनिर्मितीच्या महायज्ञात सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. स्वदेशी जागरण मंचाच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रसेवा करण्याची उत्कट इच्छा त्यांनी व्यक्त केली असून, अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीचा हा संगम जिल्ह्याच्या स्वावलंबनाला नवी गती देणारा ठरेल.
अभियानाची व्याप्ती वाढवण्यासाठी जिल्ह्यात खालील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या
श्री. यशवंत पंडित: सिंधुदुर्ग जिल्हा सह-समन्वयक
श्री. नंदकुमार आरोलकर: कणकवली तालुका समन्वयक
बैठकीचा समारोप करताना अध्यक्षांनी अत्यंत चांगले विचार मांडले. जिल्ह्याला स्वयंरोजगारात सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रत्येक गावात व्यवसायप्रेरित सक्षम वर्ग तयार होणे अनिवार्य आहे. एखाद्या वास्तूचा पाया जर वज्रलेप असेल, तर त्यावर उभी राहणारी प्रगतीची इमारत कोणत्याही नैसर्गिक वा अनैसर्गिक संकटात ढळत नाही. हाच पाया मजबूत करण्यासाठी स्वावलंबी भारत अभियान आता अधिक जोमाने कार्यरत होणार आहे.

error: Content is protected !!