अमर कदम याला सुपारी देऊन हा खून घडवून आणला का?

आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांचा सवाल
आप व राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले डीवायएसपीना निवेदन
कणकवली शहरातील नामांकित बांधकाम व्यावसाईक सुशांत दळवी यांचा शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२६ रोजी कणकवली नजीकच्या हरकुळ गावात डोक्यात गोळी मारून झालेला खून ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या खुनाचा योग्य तपास करून खऱ्या आरोपीला गजाआड करण्याची ताकद सिंधुदुर्ग पोलिसांमध्ये आहे याची आम्हाला खात्री आहे.
मात्र या घटनेतील मुख्य संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ज्या अमर सत्यवान कदम याला ताब्यात घेतले आहे ही बाब थोडी खटकणारी आणि संशय अधिक गडद करणारी वाटत आहे. अमर कदम हा जरी घटना घडली त्यावेळी घटनास्थळावर असला तरी त्याच्यासोबत अन्य आरोपींचा सहभाग असावा असे चित्र दिसून येत आहे. तसेच हा खून ज्या पद्धतीने आणि ज्या हत्याराने करण्यात आल्याचे दिसतेय त्यावरून हे अट्टल गुन्हेगाराचे काम असल्याचे दिसून येत आहे. शिवाय अमर कदम या आरोपीमागचा सूत्रधारही कोणी दुसरा असल्याचा दाट संशय येत आहे.
महत्वाची बाब म्हणजे सुशांत दळवी यांनी कणकवली पोलिसात दोन महिन्यांपूर्वी आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीत त्यांनी काही मुंबईत चांगले राजकीय वजन असलेल्या संशयितांची नावे दिली होती. या तक्रारीचा संदर्भ घेता बांधकाम व्यावसाईक सुशांत दळवी याना कोणीतरी धमकी देऊन त्यांच्यावर राजकीय दबाव टाकत होता असल्याचेही आता समोर येवू लागले आहे.
दरम्यान सुशांत दळवी यांनी दोन महिन्यापूर्वी पोलिसात दिलेली तक्रार व या घटनेत मुख्य संशयित आरोपी अमर कदमला कशाचेतरी आमिष दाखवून हा खून करून घेण्यात आला आहे का ? किंवा अमर कदम याच्या माध्यमातून शिकारीच्या बहाण्याने सुशांत दळवी याना घटनास्थळी आणण्यात आले आणि त्यानंतर तिथे दबा धरून बसलेल्या अन्य आरोपींनी त्यांचा गोळी मारून खून केला आहे का ? या दिशेनेदेखील पोलिस तपास करतील अशी अपेक्षा आहे.
तसेच या जिल्ह्याला हादरवणारी आणि कणकवली सारख्या सर्वच अर्थाने संवेदनशील असलेल्या शहराच्या बाजूला ही घटना घडलेली असताना जिल्हा पोलिसांकडून अद्यापही अधिकृत भूमिका जनतेसमोर आलेली नाही. त्याबाबतही विचार व्हावा.
सिंधुदुर्ग हा शांतताप्रिय जिल्हा आहे. या जिल्ह्याने अनेक क्षेत्रात आपला नावलौकिक मिळविलेला आहे. या जिल्ह्यात अशा अप्रिय घटना घडून जिल्हा बदनाम होण्यापासून वाचवायचा असेल तर पोलिसांनी आपली भूमुका चोख बजावावी आणि राजकीय आथवा कोणत्याही दबावाला बळी न पडता सुशांत दळवी यांच्या खुनाचा योग्य तपास करून खरे आरोपी गजाआड करताना जनतेसमोर सत्य काय ते आणावे. अशी मागणी आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या सहित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रूपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष अतिश उर्फ भाई जेठे, डी. डी. कदम, नितेश मेस्त्री यांनी केली आहे.





