दैवज्ञ महिला मंडळ कुडाळच्या वतीने महिला दिन साजरा

कुडाळ तालुका दैवज्ञ महिला मंडळच्या वतीने नूतन अध्यक्षा स्नेहल कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दैवज्ञ भवन कुडाळ येथे महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्ह्यातील प्रसिद्ध लेखिका व शिक्षिका सौ. वृंदा कांबळी, तसेच वेलनेस कोच सौ. ऋचा सावंत या उपस्थित होत्या. यावेळी महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. पूजा मठकर खजिनदार सौ. ममता पाटणकर, सेक्रेटरी श्रीमती श्वेता कुडाळकर, सौ. प्रतिभा पाटणकर, श्रीमती श्रद्धा पाटणकर, अनुष्का ओटवणेकर, अर्चना चिंदरकर, माजी अध्यक्ष सौ. कनक पाटणकर, वर्षा मालवणकर, प्रिया मालवणकर, आशा कुडाळकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्याच बरोबर मंडळाच्या बहुसंख्य महिला सदस्य यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना लेखिका सौ. वृंदा कांबळी म्हणाल्या, समाज व्यवस्था चांगली राहिली पाहिजे तर महिलांनी पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात काम केलं पाहिजे. त्याचप्रमाणे भविष्यकालीन पिढीला संस्कारक्षम करण्याची जबाबदारी ही महिलांचीच असते. त्यासाठी महिलांनी सातत्याने कार्यरत राहिले पाहिजे.
वेलनेस कोच सौ. ऋची सावंत यांनी महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या. त्याचबरोबर महिलांचे आरोग्य चांगलं असेल त्या जागरूक असतील तर कुटुंबाचे आरोग्य चांगलं राहील अशी आशा व्यक्त केली.
यावेळी दैवज्ञ समाजातील एक भगिनी जिने महाराष्ट्रातील 100 पेक्षा जास्त गडकिल्ले सर करून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्याबद्दल सौ. नुपूर मठकर हिचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील ज्येष्ठ भगिनी सौ. उषा कुडाळकर व निवृत्त शिक्षिका श्रीमती कारेकर बाई यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच माजी अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांचा ही सत्कार करण्यात आला.
नूतन अध्यक्षा सौ. स्नेहल कुडाळकर म्हणाल्या की, आपण कार्यभाग स्वीकारला आहे. येणाऱ्या वर्षभरात सर्वांनी मिळून महिला मंडळासाठी जास्तीत जास्त काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या दरम्यान चिमणी पाखरे ग्रुपच्या वतीने महिला दिनाच्या संकल्पनेतील ग्रुप डान्स सादर करण्यात आले. प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन मंडळाच्या सेक्रेटरी श्रीमती श्वेता कुडाळकर यांनी केले.

error: Content is protected !!