शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते भरणी ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन
ग्रामपंचायत इमारत बांधकामा सोबतच भरणी गावच्या विकासासाठी लागणारा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून दिला जाईल असे आश्वासन शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे यांनी दिले आहे.
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत मंजूर झालेल्या भरणी ग्रामपंचायत इमारत भूमिपूजन कार्यक्रम नुकताच पार पडला, या प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्याने आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भरणी गावाच्या विकासासाठी लागणारे सर्व सहकार्य आपण करू. भरणी गावावर आपले विशेष प्रेम असून येथील अनेक गाववाशियांशी आपले अनेक वर्षाचे ऋणानुबंध असल्याचे ते यावेळी म्हणाले.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती संदेश पटेल यांनी यावेळी बोलताना सांगितले की, गावातील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू. तसेच अजून काही कामे असल्यासही तीही मार्गी लावू असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
भरणी सरपंच अनिल बागवे यांनी यावेळी ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी देण्यासाठी शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास निधीला दिलेल्या मंजूरीबाबत सरपंच बागवे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
भरणी सरपंच अनिल बागवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री संदेश पटेल, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, भरणी उपसरपंच प्रशांत घाडी, पोलीस पाटील लक्ष्मीकांत ताम्हणकर, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष चंद्रकांत घाडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश बागवे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय गुरव, श्रीमती जगताप, माजी पोलिस पाटील अनंत गुरव, भारतीय मजदूर कामगार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक घाडी, अशोक गुरव, अशोक राऊळ, प्रकाश गुरव, आनंद साळसकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.





