राष्ट्रीय परिषदेसाठी वायंगणी सरपंच अस्मि प्रशांत लाड यांची निवड

कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व; ११ मार्च रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींच्या राष्ट्रीय परिषदेत सहभाग

केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयामार्फत दिनांक ११ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित “महिला लोकप्रतिनिधींच्या राष्ट्रीय परिषदेसाठी” कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अस्मि प्रशांत लाड यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिला लोकप्रतिनिधींमधून निवड करून ही यादी केंद्र शासनाकडे पाठविली आहे. त्यामध्ये कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी वायंगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अस्मि प्रशांत लाड यांना मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कणकवली तालुक्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

देशभरातील महिला लोकप्रतिनिधींना एकत्र आणून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचे नेतृत्व, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण तसेच विविध विकासात्मक उपक्रमांबाबत चर्चा करण्यासाठी ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेसाठी निवड झाल्याबद्दल सौ. अस्मि प्रशांत लाड यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा, कणकवली तालुका तसेच वायंगणी गावातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

error: Content is protected !!