भूमी अभिलेख विभागामधील रिक्त पदे व प्रलंबित मोजणी प्रकरणाबाबत तातडीने निर्णय घ्या!

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी

महसूल मंत्र्यांकडून जमाबंदी आयुक्तांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सध्या ८०० पेक्षा अधिक मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी उपअधीक्षकाची नियुक्ती नसल्यामुळे कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत चालविला जात आहे. कार्यालयातील सुमारे ५० टक्के पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला असून नागरिकांना वेळेत सेवा मिळत नाही. त्यामुळे ही रिक्त पदेभरा अशी मागणी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे त्यावर श्री बावनकुळे यांनी जमाबंदी आयुक्त तथा भूमि अभिलेख संचालक यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिले आहेत. नगराध्यक्ष संदेश परकर यांनी महसूल मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे शेतकरी, जमीनधारक व सर्वसामान्य नागरिकांना मोजणी, हद्द निश्चिती, नकाशे, आकारफोड, कमी-जास्त पत्रके तसेच इतर महसुली कामांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.कणकवली उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कायमस्वरूपी उपअधीक्षकाची तातडीने नियुक्ती करावी. रिक्त असलेली सर्व अधिकारी व कर्मचारी पदे त्वरित भरावीत. प्रलंबित ८०० हून अधिक मोजणी प्रकरणे निश्चित कालमर्यादेत निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा मिळावी यासाठी आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या कार्यालयाच्या कामकाजाची वरिष्ठ स्तरावरून पाहणी करून आवश्यक सुधारणा कराव्यात. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

error: Content is protected !!