एकाच घरात वेगवेगळ्या आडनावांच्या व्यक्तींची नोंद असल्यास वास्तव्याचा पुरावा ग्राह्य धरण्यासाठी निकष कोणते?

एसआयआर संदर्भात लेखी स्वरूपात माहिती द्या
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी
महसूल मंत्र्यांकडून राज्य निवडणूक आयोगाला कार्यवाही बाबत सूचना
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान मतदार नोंदणी, पडताळणी, वास्तव्याचा पुरावा (Proof of Ordinary Residence) व घरभेट याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला असून विविध स्तरांवर वेगवेगळी माहिती दिली जात आहे. परिणामी अनेक पात्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.तरी मतदार यादी अचूक, पारदर्शक, एकसमान व कायदेशीर पद्धतीने तयार व्हावी तसेच कोणत्याही पात्र मतदारावर अन्याय होऊ नये, या उद्देशाने खालील मुद्द्यांवर लेखी स्पष्टीकरण देण्यात यावे. अशी मागणी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यावर महसूल मंत्र्यांनी राज्य निवडणूक आयोगाला याबाबत कार्यवाही करण्याबाबत शेरा दिला आहे. या निवेदनात संदेश पारकर यांनी म्हटले आहे, एका घर क्रमांकावर विविध आडनावे, जाती, धर्म अथवा वेगवेगळ्या कुटुंबातील व्यक्ती वास्तव्याचा दावा करत असतील, तर त्यांचा “वास्तव्याचा पुरावा” म्हणून ग्राह्य धरण्याचे निकष कोणते आहेत? सदर मुद्द्याबाबत लागू असलेली कायदेशीर तरतूद, अधिनियम, नियम, परिपत्रके, मार्गदर्शक सूचना, आदेश, कार्यपद्धती (SOP), तसेच SIR अंतर्गत आजपर्यंत अशा प्रकारची किती घरे आढळून आली आहेत याची मतदान केंद्रनिहाय आकडेवारी, पडताळणी अहवाल, त्यासंबंधित अभिलेख, कार्यवाही अहवाल याबाबतची लेखी माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. घराच्या क्षेत्रफळावर किंवा उपलब्ध जागेच्या आधारे एका पत्त्यावर किती व्यक्ती मतदार म्हणून नोंदविता येतील, याबाबत भारत निवडणूक आयोगाने कोणती मर्यादा निश्चित केली आधी विषयाबाबत हा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.






