राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे कनिष्ठ बंधू राष्ट्रवादीचे युवा नेते अनिस नाईक यांनी अजित दादा पवार यांन वाहिली आदरांजली.

बारामती येथे जात घेतले दादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन.
कणकवली | मयूर ठाकूर महाराष्ट्राच्या राजकारणात परखड भूमिका,निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ यामुळे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे कायमच प्रेरणास्थान राहिले.त्यांच्या नेतृत्वाने राज्याला दिशा दिली,तर कार्यकर्त्यांना बळ दिले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.ही बातमी समजतात संपूर्ण महाराष्ट्र हळहळला.देश स्तरावरून सर्व प्रमुख नेते दादांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी बारामतीत उपस्थित राहिले आणि लाखोंच्या उपस्थितीत दादांचा अंत्यविधी पार पडला.हा क्षण दादांच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावनिक होता.या नेतृत्वाला मनापासून आदरांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांचे कनिष्ठ बंधू व युवा नेते अनिस नाईक यांनी नुकतेच बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे भेट देत दादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.या वेळी अनिस नाईक भावूक झालेले पाहायला मिळाले.अजितदादा पवार यांचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध होते.जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दादांनी असंख्य वेळा अबिद नाईक यांच्या घरी सदिच्छा भेटी दिल्या होत्या.
“दादा हे केवळ नेते नव्हते, ते लाखो कार्यकर्त्यांचे बळ होते,”अशा स्पष्ट भावना अजितदादा यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेताना अनिस नाईक यांच्या डोळ्यांतून दिसत होत्या.
राज्याच्या राजकारणात दादांनी दिलेले योगदान,सामान्य कार्यकर्त्यांसाठी उभे केलेले नेतृत्व आणि जनतेसाठी घेतलेले निर्णय हे सदैव स्मरणात राहतील,अशी भावना यावेळी अनिस नाईक यांनी व्यक्त केली.तसेच गुरुवार दिनांक 05 फेब्रुवारी रोजी अजित पवार यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या सांत्वनपर कार्यक्रमामध्ये अनिस नाईक यांनी उपस्थित राहत अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार,जेष्ठ पुत्र पार्थ पवार,कनिष्ठ पुत्र जय पवार आणि पुतणे रोहित पवार यांची भेट घेत दादांना आदरांजली व्यक्त केली.






