पालकमंत्री नितेश राणेंकडून आचारसंहिता भंग!

माजी आमदार परशुराम उपरकर यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेताना शपथेमध्ये उल्लेख असलेले सर्वस्तराच्या लोकांशी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्त्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देऊ असे राज्यपाल यांच्यासमोर मंत्रीपदाची सविधानाची शपथ घेताना शपथेतील हे उद्गार काढलेले आहेत. असे असताना पालकमंत्री नितेश राणे यांनी निवडणुकीच्या कालावधीमध्ये आचारसंहितेचा भंग केला असल्याची तक्रार माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील दिनांक ०२/०२/२०२६ रोजी फोंडा येथे जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती मतदार संघात प्रचार सभेमध्ये, “मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. मी ज्याला निधी देणार त्यालाच निधी मिळणार,” असे बोललेले आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकावण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या कमळ किंवा धनुष्यबाण या निशाणीच्या उमेदवारांना निधी देणार आहे. मशाल निशाणीचा उमेदवार असेल त्याला निधी देणार नाही, असे प्रकारच्या वक्तव्ये करुन आमिष दाखवून आचारसंहितेचा भंग केलेला आहे.
त्याचबरोबर त्यांनी असेही म्हटले आहे की, ग्रामपंचायतच्या निवडणुकीत असे केल्याने अनेक सरपंच माझ्याकडे भाजप पक्षात आले आहेत. त्यामुळे मी पालकमंत्री म्हणून निधी दिला नाही, तर हे काय करणार? असे बोलून विरोधी पक्ष व कार्यकार्यांना सत्तेच्या जोरावर संपवण्याचा प्रयत्न चालवला आहे. हे संवीधानाला धरून नाही. ही संविधानाची पायमल्ली केली जात आहे. पालकमंत्री यांच्या विधानसभा मतदारसंघात ७ जिल्हा परिषद व १३ पंचायत समितीचे विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पैशाचे आमिष, निधीचे आमिष तसेच दमदाटी करून अशा प्रकारे लोकशाहीचा गळा दाबून बिनविरोध केलेले आहे. उमेदवार बिनविरोध करुन लोकशाहीने लोकांना मतदाराचा दिलेला अधिकार हिरावून घेण्याचे काम जिल्ह्याचे पालकमंत्री, सरकारचे प्रतिनिधी यांच्याकडून होत असून आचारसंहितेचा भंग केल्याबाबत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी श्री. उपरकर यांनी केली आहे.





