प्राथमिक शिक्षक सखाराम झोरे यांचे निधन

दोडामार्ग : बोडदे येथील पूर्ण प्राथमिक शाळेचे शिक्षक सखाराम गंगाराम झोरे (वय-४४, झरेबांबर-काजूळवाडी) यांचे शनिवारी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.
विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेले सखाराम झोरे शिक्षक भारती संघटनेचे सचिव होते. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी ते नेहमी पुढे असायचे. प्रश्न सुटावेत म्हणून अधिकारी, प्रशासन, पदाधिकारी आणि शासनाकडे ते सतत पाठपुरावा करत. तसेच ते धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबईचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष होते.धनगर समाजाचे प्रश्न सुटावेत, समाजाला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून ते झटत.लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्या माध्यमातून प्रश्न सुटावेत यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असे.एका लढवय्या कार्यकर्त्याच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी , आई ,वडील , दोन मुलगे व भाऊ असा परिवार आहे. जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रासह सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. झरेबांबर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिनिधी,कोकण नाऊ, दोडामार्ग

error: Content is protected !!