गुंगीचे औषध देऊन रिक्षाचालकाला लुटणाऱ्या चोरट्याला न्यायालयीन कोठडी

कुडाळ : एका रिक्षाचालकाला गुंगीचे औषध देऊन त्याच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या उपेंद्र भाई रमण भाई पटेल (वय ४०, रा. अहमदाबाद, गुजरात) याला कुडाळ पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिथाफिने गुजरात येथून ताब्यात घेतले. या संशयित आरोपीचा कुडाळसह देवगडमधीलही एका अशाच स्वरूपाच्या घटनेत हात असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही चोरीमधील सुमारे चार टोळे पाचशे ग्रॅम सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या आरोपीला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी ही घटना घडली होती. यातील राजेश सावंत (रा. तळगांव) या रिक्षाचालकाला सुकळवाड (ता. मालवण) येथून रिक्षाभाडे ठरवून एक इसम पिंगुळी येथील राऊळ महाराज मठ येथे आला होता. राऊळ महाराज मठ येथून परत जात असताना या अज्ञात इसमाने रिक्षाचालकाला गुंगीचे औषध एका खाण्याच्या पदार्थांमधून दिले होते. यादरम्यान त्याच्याकडील २२ ग्रॅम सोने चोरून तो इसम पळून गेला होता. यानंतर या रिक्षाचालकाच्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. डी. पाटील करत होते. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुजरात-अहमदाबाद येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. डी. पाटील, पोलीस नाईक रुपेश सारंग, स्वप्निल तांबे यांनी जाऊन सापळा रचला व मोठ्या शितापीने यातील संशयित आरोपी उपेंद्रभाई रमणभाई पटेल याला ताब्यात घेतले. या संशयिताचा देवगडमधील अशाच प्रकारच्या घटनेमध्ये हात असल्याचे समोर आले असून या दोन्ही घटनांमधील एकूण ४५ ग्रॅम सोने पोलिसांनी हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ