कुडाळ प्रांताधिकारी पदाचा कार्यभार सहा महिने प्रभारीवर !

दैनंदिन कामकाजावर परिणाम

कुडाळ : कुडाळ प्रांताधिकारी पद तब्बल गेले सहा महिने रिक्त आहे. त्यामुळे कुडाळ आणि मालवण अशा दोन तालुक्यांच्या दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम होत आहे. प्रांत कार्यालयाशी निगडित विविध केसेसच्या पक्षकारांना गेले सहा महिने ‘तारीख पे तारीख’ याचाच अनुभव घ्यावा लागत आहे. त्यामुळे पक्षकारांसह सर्वसामान्य जनतेमधून याबाबत तीव्र नाराजी असून हे पद तत्काळ भरण्याची मागणी करण्यात येत आहे.
कुडाळच्या तत्कालीन प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांची सप्टेंबर-२०२२ मध्ये बदली झाली. तर १ ऑक्टोंबर २०२३ पासून हे पद रिक्त झाले आहे. यानंतर या पदाचा कार्यभार निवासी उपजिल्हाधिकारी सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला. मुळात सोनवणे यांच्याकडे उपजिल्हाधिकारी या मूळ कार्यभारासह अजूनही दोन कार्यभार सोपविण्यात आले आहेत. यामध्ये रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी व कुडाळ प्रांताधिकारी या पदांचा समावेश आहे. निवासी उपजिल्हाधिकारी हे पद महत्त्वाचे असल्याने या पदाच्या कामकाजाकडे त्यांना अधिक वेळ द्यावा लागणे साहजिकच आहे. अशातच कुडाळ प्रांताधिकारी, रोजगार हमी योजना अधिकारी, या पदांचे अतिरिक्त काम पाहताना त्यांची दमछाक होत आहे. कुडाळ प्रांताधिकारी कार्यालय येथे दैनंदिन कामकाजाचा विविध प्रकरणांच्या केसेसचे कामकाज चालू असते. सध्या कार्यभार असलेले अधिकारी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयात नियमित वेळ देऊन दैनंदिन कामकाजाचा निपटारा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अशा स्थितीत केसेस चालवणे कठीण होत असल्याने गेले सहा महिने केसेसचे कामकाज बंद आहे. त्यामुळे प्रत्येक तारीखच्या वेळी पक्षकारांना पुढची तारीख दिली जात आहे. कुडाळसाठी शुक्रवारी आणि मालवण तालुक्यासाठी दर गुरुवारी केसेसचे काम चालते. एका दिवशी सुमारे ७० ते ८० पक्षकार कार्यालयात येतात. मात्र, या एवढ्या लोकांना दर तारीख वेळी परतवून जावे लागते. प्रांताधिकारी हे महत्त्वाचे पद मागील सहा महिने रिक्त असूनही त्याची कोणतीच दखल प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी घेतलेली नाही.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!