जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने तळेरे येथे पत्रकार कृतज्ञता दिन : पत्रकारांचा केला सन्मान

पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने पत्रकार कृतज्ञता दिन आयोजित करण्यात आला. यानिमित्त संस्थेच्यावतीने पत्रकारांना गौरविण्यात आले.
यावेळी जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, श्रावणी कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक सतीश मदभावे, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या मास मिडिया विभागाचे प्रा. प्रशांत हटकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुनाथ तिरपणकर यांनी संस्थेच्या पाच वर्षातील विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी बोलताना तिरपणकर म्हणाले की, जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने दरवर्षी विविध भागातील पत्रकारांचा गौरव करण्यात येतो. आपल्या तळेरे पत्रकारांमध्ये असलेली एकजूट आणि परस्पर सहकार्य भावना लक्षात घेऊन पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार कृतज्ञता सोहळा आयोजित करून संस्थेच्यावतीने गौरव करण्यात येत आहे. खरं तर हा संस्थेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा क्षण आहे.
यावेळी उपस्थित असलेल्या उदय दुधवडकर (दैनिक रत्नागिरी टाइम्स), संजय खानविलकर (दैनिक तरुण भारत), दत्तात्रय मारकड (दैनिक पुढारी), निकेत पावसकर (दैनिक लोकमत), महेश तेली (दैनिक नवराष्ट्र), अंकित घाडीगावकर (दैनिक सागर) यांना सन्मानपत्र आणि पेन देऊन गौरविण्यात आले.
तळेरे येथे पत्रकार अभ्यासक्रम (चौकट)
यावेळी बोलताना प्रा. प्रशांत हटकर म्हणाले की, तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाचे “मास मिडिया” हा अभ्यासक्रम सुरू आहे. आणि यातून अनेक विद्यार्थी मुंबई सारख्या शहरात चांगल्या जॉब वर कार्यरत असून आपल्या जिल्ह्यातील तरुणांनी आणि सध्याचे तंत्रज्ञानांचे युग पाहता पत्रकारांनी हा अभ्यासक्रम जरूर करावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमात संस्थेच्यावतीने उदय दुधवडकर, सतीश मदभावे, प्रशांत हटकर यांना शाल, श्रीफळ व गुलाब फुल देऊन सत्कार करण्यात आला. तर तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्यावतीने शाल, श्रीफळ व गुलाब फुल देऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सतीश मदभावे, प्रशांत हटकर, उदय दुधवडकर, संजय खानविलकर, दत्तात्रय मारकड, महेश तेली, अंकित घाडीगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश मदभावे आणि निकेत पावसकर यांनी केले.





