रास्त धान्य दुकानावरील भेसळयुक्त तांदळाचे वितरण थांबवा !

उध्दव ठाकरे शिवसेना कुडाळतर्फे तहसीलदारांना निवेदन
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फे हवेली येथील ग्रामस्थ यशवंत घोगळे यांना काही दिवसांपूर्वी रास्त धान्य दुकानातून मिळालेल्या मोफत धान्यात प्लास्टिकसदृश्य तांदूळ आढळून आला. हा तांदूळ पाण्यात टाकला असता तो पाण्यावर तरंगताना निदर्शनास आल्यामुळे रास्त धान्य दुकानात मिळणारा तांदूळ भेसळयुक्त असून नागरिकांच्या जीवाला हानिकारक आहे. याबाबत सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी. तसेच भेसळयुक्त धान्य वितरण थांबवावे, अशी मागणी कुडाळ तहसीलदार यांच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कुडाळच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आज कुडाळ तहसीलदार तसेच पुरवठा अधिकारी कुडाळ यांना देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, बबन बोभाटे, संदीप महाडेश्वर, गोट्या चव्हाण, नितीन सावंत, सचिन गावडे, कृष्णा तेली, अजित शिरोडकर, प्रभाकर वारंग, बंड्या कोरगावकर, सोनवडेकर आदी उपस्थित होते.
रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ