मालवणी रिल्सचा बहारदार मालवणी अवॉर्ड सोहळा
मालवणी भाषा दिनाचे औचित्य
निलेश जोशी । कुडाळ : विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने पुढील वर्षांपासून मालवणी भाषा दिनाच्या निमित्ताने जागतिक मालवणी साहित्य संमेलन भरविण्यात येईल. तसेच गोवा कला अकादमीच्या धर्तीवर मालवणी कला अकादमी सुरु करण्यात येईल, अशा दोन महत्वपूर्ण घोषणा विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष युवा उद्योजक विशाल परब यांनी केल्या. कुडाळ येथे मालवणी रिल्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मालवणी अवॉर्ड सोहळ्यच्या उदघाटनप्रसंगी विशाल परब बोलत होते. मालवणी सन्मान, मालवणी विविध कॅटेगिरी अवॉर्ड, नृत्य, स्किट, नेरुरचे रोबाट, लाईव्ह दशावतारी पार्श्वसंगीत आणि त्याला निलेश गुरव, बदल चौधरी आणि रुचिता शिर्के यांच्या बहारदार मालवणी सूत्रसंचालनाची साथ यामुळे हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला.
मालवणी नाट्यसम्राट मच्छिन्द्र कांबळी ४ एप्रिल हा जन्मदिवस. हा दिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचाच औचित्य साधून रिल्स मालवणी यांनी या पहिल्या मालवणी अवॉर्ड सोहळयाचे आयोजन केले होते. या सोहळयाचे उदघाटन पद्मश्री परशुराम गंगावणे आणि उपस्थित मान्यवराच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि मच्छिन्द्र कांबळी यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. विशाल परब यांनी श्रीफळ वाढवून रंगमंच पूजन केले. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री परशुराम गंगावणे, विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब, नगराध्यक्ष आफरीन करोल, लोकमान्य मल्टिपर्पजचे आनंद सामंत, टीव्ही मालिका दिग्दर्शक रवी करमरकर, उद्योजक एस.पी. सामंत, बीडीओ विजय चव्हाण, मराठा समाज हॉल चेअरमन शशिकांत गावडे, स्टेट बँकेचे विनायक कुराडे, साईनाथ जळवी, संध्या तेरसे, विनायक राणे, नगरसेविका चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, अजित राणे, डॉ. जी.टी. राणे आणि मालवणी सन्मान विजेते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना विशाल परब यांनी रिल्स मालवणी ग्रुपचे कौतुक केले. मच्छिन्द्र कांबळी यांचा जन्मदिन म्हणजेच मालवणी भाषा दिन पुढील वर्षी पासून विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात येईल. त्यासाठी विशाल सेवा फाउंडेशन पुढाकार घेणार असल्याचे श्री. परब म्हणाले. पुढील वर्षी याच दिवशी जागतिक मराठी साहित्य संमेलनांच्या धर्तीवर जागतिक मालवणी संमेलन आणि गोव्याच्या कला अकादमीच्या धर्तीवर मालवणी कला अकादमी सुरु करणार असल्याचे श्री. परब यांनी सांगितले.
मान्यवरांचा गौरव
मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये मालवणी कवी सुनंदा कांबळी, दादा मडकईकर, रुजारिओ पिंटो, मालवणी भाषा अभ्यासक डॉ. सई लळीत, मालवणी साहित्य लेखन अर्जुन राणे, मालवणी अभिनेता दिगंबर नाईक, अभिनेता बाळ पुजारे याना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, भेटवस्तू आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मालवणी कॅटेगिरी अवॉर्ड वितरण
विविध उपक्रम राबविणाऱ्याना मालवणी अवॉर्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये मालवणी पदार्पण – रुची नेरूरकर, मालवणी एकांकिका – घरोट, मालवणी नाटक – चित्रकथी, मालवणी लघुपट – टॉवर, मालवणी चित्रपट – धुमशान, मालवणी गीत – ह्यो माझो कोकण गाव, मालवणी दशावतारी कलाकार – तुकाराम गावडे, मालवणी निवेदक – बादल चौधरी, मालवणी वार्ताहर – जुईली पांगम, मालवणी प्रभावक स्त्री – अंकिता प्रभू वालावलकर, मालवणी प्रभवाक पुरुष- लक्ष्मीकांत कांबळी, मालवणी रील – ऋत्विक धुरी आणि आकाश सकपाळ, मालवणी हूक लाईन – गौरेष कांबळी, मालवणी खाद्यसंस्कृती – रेड सॉईल स्टोरीज, मालवणी व्यवसाय – बायग्या, मालवणी जीवनशैली – कोंकणी रान माणूस प्रसाद गावडे याना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
मालवणी अवॉर्डसची सुरुवात मछिंद्र कांबळी यांच्यावरील माहितीपटाने झाली. तसेच यावेळी नेरुरचे रोबाट, विविध नृत्य, स्किट, बतावणी यांनी कार्यक्रमात अधिक रंगत आणली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिल्स मालवणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर यांनी केले. विश्वजित पालव यांनी मालवणी गाऱ्हाणे घालून मालवणी अवॉर्ड्सची दणदणीत सुरुवात केली. संपूर्ण कार्यक्रमाला असलेले दशावतारी बाजाचे लाईव्ह पार्श्वसंगीत यामुळे कार्यक्रमात एक जिवंतपणा होता. हि संगीत साथ दिली होती रोहन चव्हाण, रोशन चव्हाण, विवेक पालकर, शुभव सुतार, अतुल उमळकर आणि बंधू यांनी. तसेच निलेश गुरव, बदल चौधरी आणि रुचिता शिर्के यांच्या बहारदार आणि ओघवत्या सूत्रसंचालनेने कार्यक्रमात आणखी रंग भरले. आभार प्रदर्शन विठ्ठल तळवलकर यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक अभिजित वारंग, केदार देसाई, राजा सामंत, निलेश उर्फ बंड्या जोशी तसेच रिल्स मालवणीचे अध्यक्ष – तुषार तळकटकर, उपाध्यक्ष – विठ्ठल तळवलकर, क्रिएटिव्ह हेड तेजस मसके, सदस्य रुचिता शिर्के, पूजा सावंत, विश्वजित पालव, रोहन नेरुरकर, रामचंद्र आईर, सचिन कोंडस्कर, हर्षवर्धन जोशी, साईराज नाईक, गौरव पाटकर, मनीष पाटकर, आशिष करंगूटकर, रामचंद्र राणे, किशोर नाईक आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते, कुटुंबीय आणि रसिक उपस्थित होते. मालवणी भाषा दिनाचे औचित्य साधून कुडाळ मध्ये झालेला हा रिल्स मालवणी आयोजित मालवणी अवॉर्ड सोहळा रसिकांच्या उदंड उपस्थितीने उत्तरोत्तर रंगतच गेला.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.