व्यक्तिमत्व विकासासाठी उत्तम वक्तृत्व महत्वाचं – निलेश जोशी

चेंदवण येथील माऊली विद्यालयात वक्तृत्व आणि अभिनय कौशल्य कार्यशाळा
व्यक्तिमत्व विकासासाठी चांगलं बोलणं आणि थोडीफार अभिनय कौशल्य आवश्यक आहेत, अस मत सिनेनाट्य अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य प्रशिक्षक आणि आकाशवाणी निवेदक निलेश जोशी यांनी व्यक्त केले. श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शनिवारी निलेश जोशी यांची अभिनय व वक्तृत्व कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. जोशी बोलत होते. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे प्रसिद्ध नाट्य प्रशिक्षक निलेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अभिनय व वक्तृत्व कौशल्य’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कसे बोलायचे, कसे चालायचे, ओंकार, आवाजाचे व्यायाम, रंगभूमी आणि अभिनय संबंधी प्राथमिक माहिती, याविषयी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन श्री. जोशी यांनी केले.
या कार्यशाळेत पाचवी ते दहावीच्या सुमारे ८० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वक्तृत्वात आत्मविश्वास कसा वाढवावा, बोलताना शारीरिक हावभाव कसे ठेवावेत, अभिनय करताना संवाद कसा साधावा. अभिनय आणि अभिनेता म्हणजे काय, याबाबत श्री. जोशी प्रत्यक्ष सराव करून घेतला. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व व अभिनयाविषयीची रुची आणि आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.
ही कार्यशाळा आणि श्री. जोशी यांची मार्गदर्शन करायची पद्धत विद्यार्थ्यांना विशेष आवडली. अनेक विद्यार्थ्यांनी कार्यशाळेनंतर अशी कार्यशाळा पुन्हा घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली.
श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण तसेच चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई यांच्या वतीने प्रशिक्षक निलेश जोशी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विद्यालय तथा मंडळाच्या वतीने निलेश जोशी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.





