रविंद्र मांजरेकर यांची कोकण रत्न पदवी पुरस्कारासाठी निवड

कणकवली तालुक्यातील कुरंगवणे मांजरेकरवाडी गावचे सुपूत्र आणि सध्या कामानिमित्ताने अंधेरी, मुंबई येथे मध्ये स्थायिक असलेले श्री. रविंद्र तारामती हरिश्चंद्र मांजरेकर यांना नुकताच त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे “कोकण रत्न पदवी पुरस्कारासाठी निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
या गौरव पुरस्कार सोहळ्याचे वितरण शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई पत्रकार भवन, आझाद मैदान मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे मुंबई पासून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर पर्यंतच्या निवडक व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक श्री. संजय कोकरेभुषवणार असून वरिष्ठ पत्रकार सचिन कळझूनकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मुंबई अध्यक्ष श्री. धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, संघटनेचे नेते सुभाष राणे, आसनी सल्लागार श्री. दिलीप लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.श्री. रविंद्र मांजरेकर हे १९८८ पासून सतत मुंबई महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रात लोकांच्या समस्या मांडत असून सध्या फेसबुक, व्हाट्सअप, एक्स या समाज माध्यमातून जनसामान्यांच्या विविध प्रश्नावर लिखाण करत आहेत. तर
यापूर्वी त्यांना मुंबई वृत्तपत्र लेखक संघाचा आदर्श नागरिक पुरस्कार, महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचा पत्र मित्र पुरस्कार, मंडणगड दापोली तालुका वृत्तपत्र लेखक संघाचा आदर्श नागरिक पुरस्कार, तसेच श्रावण स्मृती मंच मुंबई यांचा पत्रदर्पण पुरस्कार असे विविध प्रकारचे ३५/४० नामांकित पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
याबरोबरच खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे श्री. मांजरेकर हे उपाध्यक्ष असून पश्चिम कुरंगवणे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे खजिनदार म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यांच्या या संपूर्ण समाज कार्याची दखल स्वतंत्र कोकण राज्य अभियानाच्या वतीने घेण्यात येऊन यावर्षीचा कोकण रत्न पदवी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.





