कुडाळमध्ये आजपासून सर्कसचा थरार

कुडाळ : कुडाळ येथील नवीन एसटी डेपो (हायवेलगत)च्या मैदानावर आजपासून अबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुपरस्टार सर्कस सुरू होत आहे. या ठिकाणी पुढील काही दिवस ही सर्कस चालणार असून याचे दररोज तीन शो होणार आहेत. कलाकारांचे विविध चित्तथरारक खेळ, कसरती, मोटारसायकल स्टंट आणि मौत का कुवा हे या सर्कसचे खास आकर्षण असणार आहे. आज शुभारंभानिमित्त एकच शो होणार असून मंगळवार, ४ एप्रिलपासून दररोज ३ शो होणार आहेत, अशी माहिती सुपरस्टार सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.
येथील नवीन एसटी डेपोच्या मैदानावर या सर्कसची जय्यत तयारी गेले आठ दिवस सुरू असून भव्य तंबू उभारण्यात आला आहे. या सर्कसच्या ठिकाणी काल (रविवारी) सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी सर्कसविषयी माहिती दिली. यावेळी व्यवस्थापक एम. एम. मुजावर, विजय माने व नागेश नेमळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी माने म्हणाले की, कोरोना महामारी कालावधीत गेली दोन वर्षे प्रेक्षकांना मनोरंजनाचा आनंद घेता आला नव्हता. या दोन वर्षांच्या कालावधीत सर्कसमधील कलाकारांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र, आता नव्या दमाने पुन्हा एकदा ही महाराष्ट्रीयन सुपरस्टार सर्कस चालू झाली आहे. कोकणात कणकवली येथे सन २०१७ मध्ये सुपरस्टार सर्कस झाली होती. पाच वर्षांनंतर आता पुन्हा एकदा कुडाळ येथे ही सर्कस सुरू होत आहे. आज सायंकाळी ७.३० वाजता कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते या सर्कसचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, पोलिस निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या उदघाटनानंतर लगेचच पहिल्या दिवशीचा एकच शो होणार आहे. त्यानंतर मंगळवार, ४ एप्रिलपासून दररोज दुपारी १ वा., सायं. ४ आणि ७ वा. असे तीन प्रयोग होणार असून या सर्कस मधून सलग २ तास प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाणार आहे. यात कलाकारांचे विविध चित्तथरारक खेळ, कसरती आणि मौत का कुवा हे या सर्कसचे खास आकर्षण आहे. मोटरसायकल स्टंट, हवाई झुला, रशियन रिंग डान्स, सिंगल व डबल सायकल स्टंट यांसह अनेक खेळ या सर्कसमध्ये पाहावयास मिळणार आहेत.
या सर्कसमध्ये नेपाळ, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील ६५ हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. या सर्कसध्ये २५ महिला कलाकार असून ३ फुट उंचीचे चार विदूषक असून ते आपल्या करामतीतून अबालवृद्धांना खळखळून हसवणार आहेत. ८०० हून अधिक प्रेक्षक एकाचवेळी सर्कस पाहतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी अल्पदरात प्रवेशिका ठेवण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी या सर्कसला आवर्जून भेट द्यावी आणि मनोरंजनाचा आनंद घ्यावा असे आवाहन यावेळी सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी केले आहे.
प्रकाश माने हे सांगली जिल्ह्यातील जत गावचे रहिवाशी असून ते गेली तीन पिढ्या सर्कस चालवत आहेत. आपण १९९३ पासून न्यु गोल्डन सर्कस सुरू केली. मात्र, त्यानंतर काही वर्षांत २००१ मध्ये सर्कसमध्ये प्राणी आणण्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आपण कर्जबाजारी झाल्याने ही सर्कस विकली. पुन्हा २०१२ पासून सुपरस्टार सर्कस सुरू केली असून भारतातील ही एकमेव महाराष्ट्रीयन सर्कस आहे. या सर्कसचे आतापर्यंत महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात, बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यात प्रयोग झाले आहेत असे या सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी यावेळी सांगितले.
प्रतिनिधी, कुडाळ