तिथवली-चिंचवली-खारेपाटण रोड डांबरीकरणाचा चिंचवली येथे शुभारंभ

कोकण रेल्वेच्या खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनच्या दृष्टीने व प्रवासी वर्गाला फायदेशीर ठरणाऱ्या प्रस्तावित तिथवली- चिंचवली – कोर्ले – मुटाट – मणचे-वाघोठण या प्रजिमा क्र.१ रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ आज चिंचवली येथे माजी पंचायत समिती सदस्या सौ.तृप्ती माळवदे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती श्री रवींद्र उर्फ बाळा जठार,भाजप शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, चिंचवली सरपंच अशोक पाटील, माजी सरपंच अनिल पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य मधुकर बांदिवडेकर,काका भालेकर, विद्या पांचाळ, ग्रामस्थ रघुवीर भालेकर, दीपक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन चिंचवलीला येण्यासाठी हा प्रमुख मार्ग असून रेल्वे स्टेशन पासून चिंचवलीकडे येणारा सुमारे ४०० मीटर लांबीचा हा रस्ता अत्यंत खराब झाला होता. लवकरात लवकर या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी या परिसरातील लोकांची मागणी होती.सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन या कामाची सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण