राजन तेली यांचे कुडाळ मध्ये स्वागत

माजी आमदार राजन तेली याना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे. असे मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले. राजन तेली यांचे आज शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. सावंतवाडीतील स्वागत स्वीकारल्यानंतर त्यांनी आज कुडाळ येथील महायुतीच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी आमदार निलेश राणे बोलत होते. युती होईल नाही होईल, हा पुढचा विषय आहे. पण तुम्ही तुमच्या कामाला लागा असा स्पष्ट सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तर बाळासाहेबांचा कोकण बालेकिल्ला पुन्हा मिळवू असा निर्धार राजन तेली यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजन तेली यांना सोबत घेऊन काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तेली यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना कोणताही पश्चात्ताप वाटू नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. राणे यांनी स्पष्ट केले की, आगामी नगरपंचायत आणि इतर निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. राजन तेली यांची जी ओळख आहे, जो जनसंपर्क आहे, त्याचा फायदा आपण सर्वांनी करून घेणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
शिवसेना-भाजप युतीबद्दल बोलताना निलेश राणे यांनी, “युती होईल नाही होईल, हा पुढचा विषय आहे. पण तुम्ही तुमच्या कामाला लागा,” असा स्पष्ट सल्ला कार्यकर्त्यांना दिला. युतीच्या निर्णयाची वाट न पाहता, सर्वांनी आपापल्या स्तरावर निवडणुकीच्या तयारीला लागून पक्षाची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. राजन तेली यांना सामावून घेत सर्वांनी समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माजी आमदार राजन तेली यांनी कुडाळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात (शिंदे सेना) प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेचा प्रभाव निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
यावेळी बोलताना राजन तेली म्हणाले, आगामी निवडणुकीचा काळ महत्त्वाचा असून, त्या दृष्टीने पक्षबांधणी मजबूत करणे गरजेचे आहे, आता सर्वांनी पायाला भिंगरी आणल्यासारखी काम करणे गरजेचे आहे. युतीच्या संभाव्य निर्णयावर बोलताना तेलींनी स्पष्ट भूमिका घेतली. युती होईल नाही होईल हे निर्णय मोठे नेते घेतील, पण तुम्ही आपले काम चालू ठेवा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच, मदतीचे आश्वासन देत ते म्हणाले, माझी मदत लागल्यास कोणीही, कुठेही बोलवा, मी तुमच्यासाठी येणार. तेली यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कोकण हा बालेकिल्ला होता, याची आठवण करून दिली. तोच बालेकिल्ला आपल्याला परत कायम करायचा आहे, असा स्पष्ट निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी संजय आंग्रे, संजय पडते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





