उज्ज्वल भविष्यासाठी युवकांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे – अर्पिता मुंबरकर

नशाबंदी मंडळामार्फत युवा वर्गाशी व्यसनमुक्तीवर संवाद
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित व्यसनमुक्ती सप्ताहानिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरस येथे युवकांसाठी व्यसनमुक्ती विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात नशाबंदी मंडळाच्या अर्पिता मुंबरकर यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आज युवकांनी शिक्षण आणि करिअरकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने अनेक युवक तंबाखू, गुटखा, दारू यांसारख्या पदार्थांपासून ते चरस, गांजा, ब्राऊन शुगर, स्मॅक, पार्टी ड्रग्सपर्यंतच्या व्यसनांकडे आकृष्ट होत आहेत. ही अत्यंत चिंताजनक बाब असून समाजाच्या भवितव्याला धोक्याची घंटा आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “प्रत्येक युवकाने स्वतः व्यसनांपासून दूर राहून इतरांनाही त्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हाच उज्ज्वल भविष्य घडू शकेल.”
यावेळी ओरस पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबल भक्ती सावंत आणि शितल नांदोस्कर यांनी मोबाईलचा योग्य वापर, सोशल मीडिया जबाबदारी, पोक्सो कायदा, रॅगिंग आणि वाहतूक नियंत्रण या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्राचार्य ए. एस. मोहारे आणि यु. एम. गोरे यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. ए. परब यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. टी. खरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन करण्यात आली.





