मुलांना आवडीनुसार करिअर घडविण्याची संधी द्या – मोनिका बलदवा

पालकांनी मुलांच्या आवडीनुसार करिअर घडविण्याची संधी मुलांना द्यावी, इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळचा सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जयसिंगपूरच्या संचालिका मोनिका बलदवा यांनी केले. कुडाळ हायस्कूल येथील सेमिनार मध्ये त्या चाॅईस करिअर कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ. सानिका मदने, माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन डाॅ. सायली प्रभू, सचिव सौ. सई तेली, कुडाळ हायस्कूल कुडाळ संस्थेचे काशिनाथ सामंत सर, संस्था उपाध्यक्ष अरविंद शिरसाट, महेंद्र गवस, गजानन कांदळगावकर, मुख्याध्यापक विपिन वराडे, रोटरी असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, इनरव्हील पदाधिकारी-सदस्य सौ. मेघा भोगटे, सौ. ऋतुजा परब, सौ. अश्विनी डांगी, सौ. पद्मा वेंगुर्लेकर, सौ. रश्मी नाईक, सौ. मनाली नाईक आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवी, नववी, दहावीच्या 500 विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय बौध्दिक चाचणी 12 सप्टेंबर रोजी इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ व इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 कडून सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत जयसिंगपूर येथील चाॅईस करिअर कडून घेण्यात आली होती. या विद्यार्थ्यांपैकी 150 विद्यार्थी व पालक, शिक्षक यांचे सेमिनार कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे संपन्न झाले. या सेमिनार मध्ये विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय बौध्दिक चाचणीचे विश्लेषण कार्ड, 150 हून जास्त विविध क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन पुस्तिका देण्यात आली.
प्रसिध्द कौन्सिलर तथा जयसिंगपूर येथील चाॅईस करिअरच्या संचालिका सौ. मोनिका बलदवा मॅडम यांनी उपस्थित पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना करिअर क्षेत्र कसे निवडावे, विद्यार्थ्यांची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, यासाठी अभ्यास कसा करावा, विद्यार्थ्यांचे मानसशास्त्रीय बौध्दिक कल कसा शोधावा याबाबत सोदाहरणासह सुंदर मार्गदर्शन या सेमिनारमध्ये केले.
कुडाळ हायस्कूल कुडाळचे निवृत्त प्राचार्य, संस्था पदाधिकारी तथा रोटरी क्लब ऑफ कुडाळचे संस्थापक सदस्य काशिनाथ सामंत सर यांनी इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळचा सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन सेमिनार उपक्रम प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम आयोजित करणे हि काळाची गरज बनली आहे. यासाठी आपले व कुडाळ हायस्कूलचे सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन सामंत सर यांनी दिले.
इनरव्हिल डिस्ट्रिक्ट 317 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील यांचा सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रम हा ड्रीम प्रोजेक्ट असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठीच जयसिंगपूर येथील चाॅईस करिअरच्या माध्यमातून 500 विद्यार्थ्यांना एकाच दिवशी मानसशास्त्रीय बौध्दिक चाचणीचा लाभ देण्याचा अनोखा विक्रम इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ ने केल्याचे कुडाळ इनरव्हिल अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी व्यक्त केले.
या सेमिनार मध्ये कुडाळ हायस्कूल कुडाळ, श्री माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण, पं. पू आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली, पांग्रड हायस्कूल, सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ, श्री लिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळसुली या शाळांमधील 150 विद्यार्थी व पालक, शिक्षक यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन सचिन मदने यांनी केले तर आभार सचिव सौ. सई तेली यांनी केले.





