पथविक्रेते यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा

कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे आवाहन
केंद्र शासनाने नुकताच पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) या योजनेचा कर्ज कालावधी ३१ डिसेंबर २०२४ वरून वाढवून आता ३१ मार्च २०३० पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अनेक फेरीवाले, लघुउद्योजक व कुटुंबांना योजनेचा लाभ अधिक काळासाठी घेता येणार आहे. शहरातील फेरीवाले त्यामध्ये भाजी विक्रते, फळ विक्रते, मच्छी विक्रते, खाद्यपदार्थ विक्रते, हातगाडीधारक असे रस्त्याच्या दुतर्फ बसणारे सर्व फेरीवाले यांनी शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली नगरपंचायत चे मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील यांनी केले आहे.
केंद्र शासनाकडून या योजनेत सुधारणा करून पहिल्या टप्प्यातील कर्ज मर्यादा १०,००० वरून १५,००० रुपये, दुसऱ्या टप्प्यातील कर्ज मर्यादा २०,००० वरून २५,००० रुपये इतकी वाढविण्यात आली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील कर्ज मर्यादा ५०,००० रुपये आहे. याशिवाय, वेळेवर हप्ता परत करणाऱ्या फेरीवाल्यांना यूपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड उपलब्ध होणार असून त्याद्वारे अचानक उद्भवणाऱ्या व्यवसाय व वैयक्तिक गरजांसाठी आर्थिक मदत मिळू शकेल. योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना डिजिटल व्यवहारांवर १,६०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.
ही योजना अधिक गतिमान पद्धतीने राबविण्यासाठी शासनाकडून १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ हा कालावधी जन कल्याण मेळावा म्हणून आयोजित करण्यात आला आहे.





