योजना अंमलबाजावणीत हयगय खपवून घेणार नाही !

मंत्री योगेश कदम यांचा अधिकाऱ्याना सज्जड इशारा
कुडाळ विधानसभा मतदारसंघाची घेतली आढावा बैठक
यापुढे कोणत्याही योजनांमध्ये हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना दिला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे सोमवारी कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री कदम यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परिपूर्ण आढावा घेत मंत्री कदम यांनी एकप्रकारे हजेरीच घेतली. यावेळी जे कोणी अधिकारी निरुत्तर झाले, त्यांना त्यांनी चांगलेच खडेबोल सुनावले.
कुडाळ मालवण मतदार संघ आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथील महालक्ष्मी हाॅल येथे सोमवारी संपन्न झाली. या बैठकीला आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर, महिला जिल्हा प्रमुख दिपलक्ष्मी पडते, कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे, मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, आनंद शिरवलकर, दिपक नारकर यांच्यासह महसुल विभाग,राज्य शासन आणि पंचायत समिती विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे गृह (शहर) महसुल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,अन्न व औषध प्रशासन मंत्री योगेश कदम यांचा नियोजित कार्यकर्ता मेळावा कुडाळ येथील महालक्ष्मी हाॅल येथे सकाळी ११ वाजता शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात दुपारी २.२५ वा. च्या सुमारास तो मेळावा म्हणा किंवा शासनाची आढावा बैठक कुडाळ मालवण मतदार संघ म्हणून सुरू झाला. या मेळाव्यात पदाधिकाऱ्यापेक्षा अधिकारी वर्गाची मोठी उपस्थिती होती. आलेले अधिकारी, हाॅलमधील पदाधिकारी-कार्यकर्याची उपस्थीती पाहून काहीसे अचंबित झाले. हाॅलमध्ये गर्दी वाढल्यामुळे मधल्या पॅसेजमध्ये व व्यासपीठाच्या समोर जादा खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी अधिकची बसण्याची व्यवस्था करण्यात आली.
व्यासपिठावरुन कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना वारंवार सूचना करत होते. या कार्यकर्ता कि आढावा बैठकीत व्यासपीठावर महाराष्ट्र शासनाचा आढावा बैठकीचा बॅनर, तर हॉलमध्ये शिवसेना पक्षाचे चार बॅनर सुध्दा लावण्यात आले होते. या आढावा बैठकीच्या नियोजनासाठी आमदार निलेश राणे स्वतः हाॅलमध्ये बसून नियोजनाचा आढावा घेत होते. हाॅलमध्ये पहिल्या रांगेत पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तर मागच्या रांगांमध्ये अधिकारी कर्मचारी बसले होते. दुपारी २.१० वाजता निलेश राणे बॅक स्टेज वरुन व्यासपीठावर आले. त्यावेळी बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना पहिल्या रांगेत बसण्याची विनंती केल्यानंतर लगेच कार्यकत्यांनी खुर्च्या लावून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था केली.
यावेळी मंत्री योगेश कदम यांनी सुरुवातीलाच आपण या ठिकाणी भाषण करण्यासाठी आलो नाही, तर सर्वसामान्य जनतेची निगडित असलेले चार विभाग माझ्याकडे आहेत, त्या विभागाचे प्रश्न प्राधान्याने सुटले पाहिजेत हे स्पष्ट केले. कोकणात पाणंद रस्ते विकसित का होत नाहीत?, जीवंत सातबारा,वाळु धोरण,आकारीपड जमीन प्रश्न, देवस्थान जमीन, याबाबत आढावा घेतला. यावेळी अधिकारी वर्गाने या ठिकाणचा आढावा दिला.यावेळी कामांमध्ये गतिमानता वाढवा तसेच लोकप्रतिनिधीना विश्वासात घ्या, अशा सक्त सूचना केल्या.
आमदार निलेश राणे यांनी वाळू बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, याठिकाणी वाळू व्यावसायामध्ये खूप लोक आहेत. ते क्रिमिनल नाहीत. त्यामुळे कोकणात वाळूसाठी एकच पॉलिसी राबविणे आवश्यक आहे. या ठिकाणी वाळू व्यवसायिकांचा चोरी हा विषय नाही, त्याबाबत आपण लक्ष द्यावे अशी विनंती केली.
त्यानंतर ना.कदम यांनी गौण खनिज अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, येत्या सात दिवसाच्या आपण टेंडर काढू अशी ग्वाही दिली. तहसील कार्यालयामध्ये केसेसची पेंडन्सी खुप आहे याबाबत आहे मंत्री कदम यांनी नाराजी व्यक्त करत या केसेस कमी करा असे आदेश दिले. तसेच शासनाच्या ज्या वास्तू आहेत (अंगणवाडी, आरोग्य केंद्र, शाळा) त्या सर्व रेकॉर्डवर आणण्यासाठी विशेष मोहीम राबवा. देवराईमध्ये सुद्धा आता बांधकाम करताना अडचणी येणार नाहीत. २३ नंबर प्रश्नी काही अडचणी येत असतील तर तहसीलदारानी जबाबदारी घेऊन रस्ते मोकळे करण्यासाठी पुढाकार घ्यावा, प्रसंगी पोलिससंरक्षण घ्यावे असे आदेश दिले.
ग्रामपंचायत विभागाच्या आढावा दरम्यान मंत्री योगेश कदम यांनी गावपातळीवर कुणी विकासकामाबाबत आडकाठी करत असेल तर त्या ग्रामपंचायतवर कारवाई झाली पाहिजे असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले. शाळेचे कंपाऊंड रोजगार हमीतून किती बांधले ? असा प्रश्न सुध्दा उपस्थित केला. रोजगार हमी, मनरेगा महत्वाच्या योजना आहेत, त्या मनावर घ्या, यावर यशस्वी काम करा. अशा सूचना केल्या.
यावेळी आ. राणे यांनी गटविकास अधिकारी श्री. वालावलकर यांना सीएसआर फंड कसे आणनार ते सांगा, तुमच्या कडे काय नियोजन आहे? ते सांगा. नुसतं वाचून दाखवू नका, असे सांगून ग्रामविकास मध्ये गतीने काम होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी मंत्री कदम यांनी लोकप्रतिनिधीना विश्वासात घ्या अशा सूचना केल्या.
तुम्ही गावात पोचत नाही, तुमचे अधिकारी खाली गावात जातच नाहीत, कुणाला माहीत नाही घरकुल योजना किती आहेत ? अशा शब्दांत आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. यावेळी मंत्री कदम यांनी गटविकास अधिकारी श्री.वालावलकर यांना, तुम्ही कार्यालयात बसू नका; गावा-गावात फिरा अशा सक्त सुचना दिल्या. अन्न औषध शासन विभागाच्या आढावा दरम्यान रेशन कार्डची केवायसी इत्यादी महिन्यात पूर्ण करून घ्या. अंत्योदय लाभार्थीची नावे किती कमी झाली ती पहा व नवीन किती ऍड झाली आहेत, त्याचीही माहिती द्या. त्यासाठी आमदारांना विश्वासात घ्या अशा सूचना मंत्री कदम यांनी दिल्या. यावेळी बचत गटांचा सुद्धा आढावा घेण्यात आला.
दरम्यान माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमीन प्रश्नावर आमदार निलेश राणेंनी शासनाकडे एसओपी जारी करण्याची मागणी केली. मंत्री कदम यांनी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले. प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या १३० हेक्टर जमिनीबाबत गैरव्यवहाराचे उल्लेख केल्यावर आमदार राणेंनी “ही समिती दुकान झाली आहे, वेळेवर बैठक घेत नाही. त्वरित बरखास्त करा,” अशी मागणी केली.





