शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या वाचन मंदिरास ‘शब्दांच्या पलीकडले पुस्तके’ अर्पण

वाचन संस्कृती वाढीसाठी सुरेश ठाकूर यांचा अनोखा उपक्रम
ज्येष्ठ ललित लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेले पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे आशिर्वाद लाभलेले, माजी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांची प्रस्तावना असलेले ‘शब्दांच्या पलीकडले’ हे संदर्भ पुस्तक १३० वर्ष पूर्ण झालेल्या आणि ग्रंथांनी समृद्ध असलेल्या श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरे यांना लेखक सुरेश ठाकूर यांनी अर्पण केले आहे. आपल्या अर्पण पत्रिकेत त्यांनी म्हटले आहे की, “ज्याने मला बालपणापासून सकस आणि चोखंदळ वाचनाचे वेड लावले, त्या माझ्या गावातीलच शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या शब्दतीर्थाला हे पुस्तक विनयपूर्वक समर्पित!
या अर्पण सोहळा प्रकाशन प्रसंगी बिडये विद्यालय केंद्र शाळा आचरे नं. १ येथे आचरे सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्याहस्ते वाचन मंदिराचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांना अर्पण करण्यात आले. पुस्तकासोबतच पुणेरी पगडी, उपरणे आणि स्मृतिचिन्ह देऊन श्री रामेश्वर वाचन मंदिरचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना वाचनालयाचे अध्यक्ष भिसळे म्हणाले की आजचा हा दिवस माझ्यासाठी खूपच भाग्याचा दिवस आहे. कारण सर्व उपस्थितांच्यावतीने मला आज हे पुस्तक स्वीकारण्याची संधी मिळाली. मी या पुस्तकाच्या वैयक्तिक ५० प्रति घेऊन श्री रामेश्वर वाचन मंदिरला भेट देत आहे. सोमवार दि. १५ सप्टेंबर २०२५ पासून ज्या व्यक्ती संस्थेच्या आजीव सभासद होतील तसेच वाचन संस्कृती वाढीसाठी रु. १०००/- किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देतील त्या प्रत्येकाला या पुस्तकाची १ प्रत देणगी म्हणून दिली जाईल. यावेळी व्यासपीठावर लेखक सुरेश ठाकूर, सरपंच जेरोन फर्नांडीस, माजी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, हिर्लेकर गुरुजी, कणकवली, कवी रुजारिओ पिंटो तसेच वाचन मंदिराचे उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यकारिणी सदस्य श्रीमती वैशाली सांबारी, जयप्रकाश परुळेकर, भिकाजी कदम, तसेच अन्य कार्यकारिणी सदस्य, सांस्कृतिक समिती सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.





