खारेपाटण मध्ये जनावरांना लंपी सदृश्य आजार ; एका बैलाचा मृत्यू

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम राबवावी

शिवसेना उपतालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर यांची मागणी

कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात सध्या पाळीव जनावरांना सदृश्य आजार लक्षणे आढळून येत असून यात एका बैलाचा मृत्यू झाला असून अन्य जनावरांच्या अंगावर पुळी सदृश्य गाठी आल्या आहेत. ही लक्षणे लंपी आजाराची असून पशुवैद्यकीय विभागाने याची तातडीने दखल घेत खारेपाटण पारिसरात तपासणी मोहीम राबवून शेतकऱ्यांचे पशुधनाचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख तथा खारेपाटण मधील सामाजिक कार्यकर्ते गोट्या कोळसुलकर यांनी केली आहे.
खारेपाटण गावातील सम्यक नगर येथील प्रभाकर कांबळे यांच्या मालकीच्या बैलाच्या अंगावर काही दिवसांपूर्वी पुळी सदृश्य गाठी आल्या होत्या. त्यावर उपचारही करण्यात आले. मात्र त्यातच त्या बैलाचा मृत्यू खारेपाटण एसटी बस स्थानकामागील भागात झाला. दरम्यान प्रभाकर कांबळे यांच्या मालकीच्या अन्य एका पाडी च्या अंगावर पुळी सदृश्य गाठी आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी असलेल्या प्रभाकर कांबळे यांचे नुकसान झाले आहे. गोठ्यातील जनावराच्या अंगावर लंपी सदृश्य गाठी आल्यामुळे खारेपाटण परिसरात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घटनेची तात्काळ दखल घेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी खारेपाटण परिसरात शोधमोहीम राबवावी. ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या अंगावर अशा गाठी आल्या असतील त्याचा शोध घेऊन योग्य ते औषधोपचार करावेत. जेणे करून या आजाराचा फैलाव रोखून अन्य पशुधन या आजारापासून वाचू शकेल. यासाठी तातडीने पशुसंवर्धन विभागाकडून खारेपाटण परिसरात शोधमोहीम राबवावी अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर यांनी केलं आहे.

error: Content is protected !!