ओरिसामधील अनोळखी म्हणून सापडलेल्या इसमाच्या कुटुंबियांचा शोध आणि घर वापसी

कुडाळ पोलिस व संविता आश्रमाचा स्तुत्य उपक्रम
संविता आश्रमातून ओरिसा राज्यातील दियाझार थिर्की या मनोरूग्ण बांधवांची नुकतीच घरवापसी करण्यात आली.
दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी कुडाळ तालुक्यातील झाराप येथे भावई मंदिर परिसरात स्थानिक नागरिकांना हा अनोळखी इसम संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. नागरिकांनी तात्काळ घेवून कुडाळ पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल तारी व पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांनी तत्परतेने घटनास्थळी पोहोचून सदर इसमाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी चौकशी केली असता सदर इसमाचे नाव दियाझार थिर्की असून तो रुझेनमल, जिल्हा बरगार, राज्य ओडिशा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. सदर व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा संशय आल्याने त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला संविता आश्रम, पणदूर (ता. कुडाळ) येथे तात्पुरत्या निवाऱ्यासाठी दाखल करण्यात आले होते.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे व संविता आश्रमच्या सहकार्यामुळे ही व्यक्ती काही दिवसांतच आपल्या घरी परत जाऊ शकली. नुकतेच दियाझार थिर्की याचे नातेवाईक रोयान व प्रदीप मिंच यांनी कुडाळ येथे येऊन संविता आश्रमाला भेट दिली आणि त्यांनी दियाझार याला आपल्या ताब्यात घेतले.
यावेळी नातेवाईकांनी स्थानिक पोलीस प्रशासन, विशेषतः कुडाळ पोलीस ठाणे, तसेच संविता आश्रम व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानले. या संपूर्ण प्रक्रियेत आश्रमाचे संस्थापक संदीप परब व स्वयंसेवक शैलेंद्र कदम यांनी विशेष सहकार्य केले.





