महायुती सरकारने आनंदाचा शिधा हिंदूंची मते मिळविण्यासाठीच वाटला होता का?

माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल

आनंदाचा शिधा बंद करण्याचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे

      एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गतवर्षी महायुती सरकारने  गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला होता. गणेशोत्सव हा हिंदूंचा सण असल्याने हा आनंदाचा शिधा देण्यात आल्याचे त्यावेळी एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारने सांगितले होते.या माध्यमातून लोकांना मदत करत असल्याचेही सांगण्यात आले. मात्र हे सर्व खोटे होते केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांची मते मिळविण्यासाठी त्यावेळी आनंदाचा शिधा वाटण्यात आला होता हे आता सिद्ध झाले आहे. कारण या वर्षीच्या गणेशोत्सवात हा आनंदाचा शिधा अद्यापपर्यंत वाटण्यात आलेला नाही,त्यावेळी ज्यांनी आनंदाच्या शिध्याची घोषणा केली होती ते आज सर्वजण सत्तेत आहेत. तरी देखील यावर्षी आनंदाच्या शिद्याचा जाणीवपूर्वक विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे. याचा आम्ही हिंदू म्हणून तीव्र निषेध व्यक्त करतो. आनंदाचा शिधा योजनेत आनंद दिघेंचे नाव असल्याने हा शिधा देण्यात आला नाही का? की सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून हा शिधा दिला नाही का? की केवळ निवडणुकीपुरतेच महायुतीच्या सत्ताधाऱ्यांना हिंदू आणि हिंदूंचे सण आठवतात का? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.
error: Content is protected !!