कणकवली शहरात पहाटे 4 वाजता धाड टाकत 15 हजाराचा गांजा जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाची धडक कारवाई

गांजा विक्रीच्या रॅकेटमध्ये अजूनही काहींचा सहभाग असण्याची शक्यता

कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील कामतसृष्टी कॉम्प्लेक्स समोरील एका घरातून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पहाटे 4 वाजण्याच्या च्या सुमारास छापा मारत शुभम उर्फ कुंदन संतोष गोसावी याच्या ताब्यातून घरात लपवून ठेवलेला 15 हजार रुपयांचा गांजा हस्तगत केला. याप्रकरणी संशयित आरोपी शुभम यांच्यावर गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) (2) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित शुभम उर्फ कुंदन याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या कारवाईमुळे कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांचे रॅकेट चालवणाऱ्यांची साखळी उघड होणार आहे. याप्रकरणी अजून काही संशयित पोलिसांच्या रडावर असल्याचेही समजते. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने 31 ऑगस्ट रोजी केली. कणकवली शहरातील कामत सृष्टी बिल्डिंग समोरील एका घरात बांदकरवाडी या भागामध्ये संशयित आरोपीने गांजा लपवून ठेवला असल्याची बातमी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला खात्रीशीर खाबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसांडेकर, श्री घोन्साल्विस, एस पी राणे, डी एस डीसोझा, डी जी तवटे, ए व्ही कांडर यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून 380 ग्रॅम वजनाची गांजाची 30 पाकिटे घरातील हॉलमधील बॅरल मध्ये ठेवलेल्या लपवून ठेवलेल्या स्थितीतून हस्तगत करण्यात आली. याबाबत ज्ञानेश्वर तवटे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!