कुडाळ शहरात फक्त ११ बॅनरसाठीच न. प. ची परवानगी

बाकीच्या बॅनरवर नगर पंचायत कारवाई करणार का ?

काही बॅनर वळणावर धोकादायक स्थितीत

कुडाळ : गणेशोत्सव सुरु झाला आहे. त्यामुळे कुडाळ शहरात ठिकठिकाणी गणेशभक्तांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकले आहेत. त्यात लोकप्रतिनिधी, व्यावसायिक यांचे बॅनर जास्त आहेत. पण शेकड्यानी बॅनर दिसत असताना यापैकी फक्त ११ जणांनीच नगर पंचायतीकडून बॅनरची परवानगी घेतली असल्याची माहिती नगर पंचायत कडून मिळाली आहे. शिवाय हे बॅनर देखील मोक्याच्या जागा पटकावण्याच्या नादात अपघाताला निमंत्रण देणार तर नाहीत ना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या ११ अधिकृत बॅनर व्यतिरिक्त शहारत जे बॅनर लागले आहेत त्यावर नगर पंचायत कारवाई करणार का, असा प्रश्न शहरवासियांकडून उपस्थित केला जातोय.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण. व्यावसायिक दृष्ट्या हा चार पैसे मिळविण्याचा काळ. अनेक मुंबईकर कोकणवासीय या निमित्ताने गावाकडे येतात. त्यांना शुभेच्छा देणे, त्यांच्या पर्यंत आपल्या व्यवसायाची जाहिरात पोहोचविणे यासाठी अनेक शुभेच्छा बॅनर लावले जातात. तसे ते कुडाळ शहरातही लावण्यात आले आहेत. आता तर मोठ्या आकाराचे बॅनर लावण्याची स्पर्धा असते. त्यामुळे मोक्याच्या जागा हेरून हे मोठे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. कुडाळच्या मुख्य रस्त्यावरून फेरफटका मारला तर जागोजागी हे बॅनर दिसतात.
काही बॅनर हे चौका चौकात लावण्यात आले आहेत. कारण त्याठिकाणी वर्दळ जास्त असते. पण या बॅनरमुळे बऱ्याचवेळा समोरून येणारे वाहन दिसत नाही आणि त्यामळे अपघाताची शक्यता निर्माण होते. काही बॅनर हे एखाद्या खांबावर टांगलेले असतात. त्याच्या खालून वाहने, पादचारी यांची ये-जा असते. जर हे बॅनर हे नागरिकांच्या डोक्यात पडून किंवा वाहनावर पडून अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण ? या बॅनरसाठी नगर पंचायतीने परवानगी दिली आहे का? परवानगी दिली नसेल तर अशा अनधिकृत बॅनरवर नगर पंचायत कारवाई करणार आहे का ?
नगर पंचायत कडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्टच्या सुरुवातीपासून अवघ्या ११ जणांनी कुडाळ नगरपंचायतची परवानगी घेऊन अधिकृत पोस्टर्स किंवा बॅनर लावले आहेत. त्यामध्ये रुपेश विलास वाळके, कुडाळ नगर पंचायत, ज्ञानदेव सावंत, सौरभ सुरेश पेंढारी, अमेय एकनाथ कुडाळकर, रोहन हनुमंत मोरे, तन्मय प्रकाश मळगावकर, तेजस आनंद माडये, तबरेज रियाज शेख आणि सुशील सुरेश चिंदरकर यांचा समावेश असल्याची माहिती नगर पंचायतच्या ना हरकत प्रमाणपत्र विभागाने दिली आहे. मग शहरात जे शेकडो शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत त्यांच्यावर नगर पंचायत कारवाई करणार का ? याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!