सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कणकवली नागवे रस्ता वाहतुकीस बंद

दरवर्षी पाणी साचत असलेल्या भागात उंची वाढवण्याची केली होती मागणी
पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार
नागवे ग्रामपंचायत सदस्य भाजपा कार्यकर्ते संदेश उर्फ मन्या सावंत यांची माहिती
गेली अनेक वर्ष सातत्याने मागणी करून देखील कणकवली नागवे रस्त्याच्या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यामुळे एसटी वाहतुकीद्वारे शाळा व कामानिमित्त जाणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांचे हाल झाले. याबाबत सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे नागवे यासह करंजे, हरकुळ, सांगवे या मार्गावरून जाणाऱ्या पुढील दशक्रोशी मधील ग्रामस्थांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे या बाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती नागवे ग्रामपंचायत सदस्य भाजपाचे कार्यकर्ते संदेश उर्फ मन्या सावंत यांनी दिली. दरवर्षी कित्येक वेळा हा रस्ता पावसाळ्यात बंद होत आहे. आज मंगळवारी सकाळी या मार्गावर पाणी भरल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे . नागवे करंजे रस्ता प्रजिमा.21 कणकवली पासून किमी 3/0 ते 3/400 येथे नागवे नर्सरी स्टॉप येथे स्लॅब डेन व माती भरवसाहित डांबरीकरण करण्याकरिता वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सतत पाठपुरावा केला होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले असा आरोप श्री सावंत यांनी केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली जाणार याबद्दल विश्वास असल्यानेच त्यांचे या प्रश्नी लवकरच लक्ष वेधणार असून या दशक्रोशी मधील ग्रामस्थांचा हा दरवर्षीचा पावसाळ्यातील प्रश्न मार्गी लावण्याची मागणी त्यांच्याकडे केली जाणार आहे असे श्री सावंत यांनी सांगितले.





