कणकवलीत ई-टॉयलेट्सचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वच्छतागृहा अभावी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना
शहरातील उड्डाणपुलाखाली कणकवली नगरपंचायतीने ई-टॉयलेट्स उभारली आहेत. या ई-टॉयलेट्सचे लोकार्पण शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक किशोर राणे, संजय कामतेकर, नगरपंचायतीचे कर्मचारी अमोल अघम, अमोल भोगले, प्रशांत राणे, सचिन नेरकर, विभव करंदीकर, रवी महाडेश्वर, ध्वजा उचले, संदीप मुसळे, सोनाली खैरे, ज्योती देऊलकर, उद्योजक मंदार सापळे, अॅड. दीपक अंधारी, प्रद्युम मुंज, संदेश सावंत आदी उपस्थित होते.
टॉयलेट्स उभारणीसाठी जिल्हा नियोजनाच्या नावीन्यपूर्ण निधीतून कणकवली नगरपंचातीला निधी उपलब्ध झाला होता. हा निधी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला होता. स्वच्छ आणि तंत्रज्ञानावर आधारित ही टॉयलेट्स आहेत. ‘पे अॅण्ड यूज’च्या धर्तीवर त्याचा वापर केला जातो. नाणे टाकल्यानंतर स्वच्छतागृहाचा वापर करता येईल. यात अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा आहे. तर २ रुपयांचे नाणे टाकल्यास दार उघडे होते. या टॉयलेटच्या पाण्याच्या टाकीत पाणी नसेल तर दार उघडत नाही. व्यक्ती बाहेर पडल्यावर आपोआप पूर्ण टायलेट वॉश होते. यात वॉश बेसीन आहे. टॉयलेटमध्ये काही अडचण अथवा कुणी आतमध्ये असल्यास लाल दिवा दिसते. काही अडचण नसल्यास हिरवा दिवा लागतो. या ई-टॉयलेटमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. उड्डाणपुलाखाली तीन ई-टॉयलेट्स उभारली आहेत. बसस्थानकसमोरील उड्डाणपुलाखाली उभारलेले ई-टॉयलेट्स केवळ महिलांसाठी उभारले आहे.
गौरी पाटील म्हणाल्या, कणकवली शहरात नेहमीच वर्दळ असते. स्वच्छतागृहाअभावी स्त्रियांसह नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता नगरपंचायतीच्या माध्यमातून व पालकमंत्री यांच्या सहकार्यातून शहरातील उड्डाणपुलाखाली तीन टॉयलेट्स उभारण्यात आली आहेत. ही टॉयलेट्स सर्व सोयीसुविधायुक्त स्वयंचलित व स्थलांतरित करता येणारी आहेत. ही टॉयलेट्स ‘सेल्फ क्लिनिंग ऍटोमॅटेड’ आहेत. टॉयलेट २४ तास सुरू ठेवण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून ई-टॉयलेट्स राबविण्यात आली आहे. शहरात यापुढील काळात नागरिकांच्या न. पं. च्या माध्यमातून नवनव्या संकल्पना राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.