कुडाळात भाजपतर्फे राहुल गांधी यांचा निषेध

ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल भाजपचे आंदोलन
राहुल गांधी विरोधात भाजपची घोषणाबाजी
निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा आज कुडाळमध्ये निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान केला आहे, त्याचा आज आम्ही निषेध करत असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी यावेळी सांगितले. या वक्तव्याबद्दल राहुल गांधी याना न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी ते न्यायालयाचा आणि संविधानाचा अपमान करत आहेत. त्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल असेही श्री. तेली म्हणाले. यावेळी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.
आज सकाळी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल समोर भाजप कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली एकत्र जमले होते. त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या विरोधात जोरदार गोषणाबाजी केली. यावेळी बोलताना राजन तेली म्हणाले, मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करत आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल राजन तेली यांनी आश्चर्य व्यक्त केले.
राजन तेली यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ”मोदी” या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला आहे. न्यायालयाने याबद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल, असेही श्री. तेली यांनी यावेळी सांगितले.
सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते, असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते. . मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत , डॉक्टर आहेत , इंजिनीअर आहेत , व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असेही राजन तेली यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जि प माजी अध्यक्ष अशोक सावंत, प्रभाकर सावंत, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, बंड्या सावंत, उपाध्यक्ष राजू राऊळ, राजा पडते, रुपेश कानडे, प्रकाश मोर्ये, राकेश नेमळेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.