शिडवणे नं. १ शाळेत ‘हिवताप प्रतिरोध महिना’ अंतर्गत विद्यार्थ्यांचे आरोग्य प्रबोधन शिबीर संपन्न

मंगळवार, २४ जून २०२५ रोजी शिडवणे नं. १ शाळेमध्ये दुपार सत्रापूर्वी ‘हिवताप प्रतिरोध महिना’ अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली. यावेळी शिडवणे आरोग्य मंदिराचे आरोग्य सेवक गणेश तेली यांनी विद्यार्थ्यांना विविध आजार आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली.
श्री. तेली यांनी पाण्यामुळे, पावसामुळे आणि डासांमुळे होणाऱ्या विविध आजारांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर प्रकाश टाकत त्यावर प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजना स्पष्ट केल्या. पाणी शुद्धीकरणाच्या विविध पद्धतींबद्दल मार्गदर्शन करताना, त्यांनी विद्यार्थ्यांना गप्पी माशांचे महत्त्व समजावून सांगितले. गप्पी मासे डासांच्या अळ्या खाऊन त्यांची उत्पत्ती कशी रोखतात, याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवत त्यांनी मुलांना सोप्या भाषेत माहिती दिली. तसेच, ‘एक दिवस कोरडा दिवस’ पाळण्याचं महत्त्व पटवून दिलं, जेणेकरून डासांची पैदास थांबवता येईल.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी आरोग्य सेवक गणेश तेली यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी, सीमा वरुणकर यांनी उपस्थितांचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या आरोग्य सेवकांचे आभार मानले.
या जनजागृती कार्यक्रमात सर्व मुलांनी हिवताप प्रतिबंधक घोषणा दिल्या. या जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व समजण्यास मदत झाली असून, भविष्यात त्यांना आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्यास प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.