कणकवली तालुक्यामध्ये वीज वितरण चा सावळा गोंधळ सुरू

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतरही वीज वितरणच्या कामात सुधारणार नाही
अनेक अधिकाऱ्यांचे नंबर “नॉट रिचेबल” कार्यकारी अभियंता समस्यांबाबत उदासीन
कणकवली तालुक्यामध्ये गेले तीन दिवस वीज वितरणचा सावळा गोंधळ सुरू असून खारेपाटण फिडर सक्षमपणे सुरू करण्यास वीज वितरण कूचकामी ठरले आहे. वीज वितरणच्या बहुतांशी अधिकाऱ्यांचे त्यांना दिलेले शासकीय मोबाईल नंबर हे नॉट रिचेबल असून खारेपाटण फिडर वरील अनेक गावांमध्ये अधून मधून कमी दाबाचा वीज पुरवठा तर पूर्णपणे वीजपुरवठात खंडित अशी स्थिती गेले तीन ते चार दिवसापासून आहे. परंतु अधिकाऱ्यांकडून स्टाफ कमी आहे, झाडे पडली, तारा तुटल्या ही गेली अनेक वर्षे चालत आलेली वीज वितरण च्या गाठोड्यातली उत्तरे देत कामात दिरंगाई केली जात आहे. वीज वितरण कडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपली यंत्रणा कुचकामी ठरण्याची स्पष्ट केले आहे. कणकवली तालुक्यातील खारेपाटण फिडरवर असलेल्या अनेक गावांमध्ये वीज पुरवठ्याची ही समस्या गेले अनेक दिवस सुरू असताना कणकवलीत कार्यालय असलेले कार्यकारी अभियंता हे बहुतांशी वेळा नॉट रिचेबल व त्यांना दिलेल्या अधिकृत क्रमांकावर कॉल केल्यास ते अनेकदा कॉल रिसिव्ह करत नसल्याची समस्या नागरिकांमधून समोर येत आहे. एकीकडे पावसाळ्यापूर्वी ही कामे मार्गी लावण्याची आवश्यकता असताना ही कामे करण्यावर वीज वितरण कडून पुरते दुर्लक्ष केले गेल्याने आता इन्सुलेटर खराब झाले अशी कारणे देऊन वीज वितरण वेळ काढून घेत आहे. तर काही अधिकाऱ्यांकडून काम चालू आहे, लाईट लवकरच येईल अशी आशादाई उत्तरे दिली जात आहेत. दरवर्षी वीज वितरण पावसाळ्यापूर्वी आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगते. मात्र वीज वितरण चा खेळ खंडोबा हा कणकवली तालुक्यातील नागरिकांना त्रासदायक ठरत असून काही दिवसांपूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना देऊनही वीज वितरण च्या कारभारात कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे वीज अधिकारी ही समस्या गांभीर्याने घेणार का? की अशाच प्रकारे सावळा गोंधळ सुरू राहणार? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली