तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट दिल्या प्रकरणी संशयित पतीला सशर्थ अटकपुर्व जामीन मंजुर

संशयिताच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद
वैभववाडी येथील पतीने आपल्या पत्नीचा छळ करत क्रुरपणे वागणुक देऊन तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट दिल्या प्रकरणी संशयित पती बिलाल नाजीर बक्कर, (ठाणे मूळ राह. वैभववाडी) याला सिंधुदुर्ग ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी अटकपुर्व जामीन मंजुर केला. आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.
फेब्रुवारी २०२२ मधे फिर्यादी व संशयित यांचा विवाह झाला होता. संशयित पती व सासू , सासरे यांनी पैशाची मागणी करत फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण करत घराबाहेर काढले. तसेच पतीने तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट दिल्याबाबत फिर्यादीने दिनांक १९/१०/२४ रोजी दिलेल्या तक्रारीवरून वैभववाडी पोलिस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 86, 3(5) व मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संशयित पतीने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन त्याला 50 हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्याला साक्षीदारांवर दबाव आणू नये, सरकार पक्षाच्या पुराव्यात अडथळा करू नये आदी अटी घातल्या आहेत.





