आपत्ती कालावधीमध्ये तात्काळ संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वॉकी टॉकी प्रदान

आपत्ती कालावधीमध्ये वॉकी टॉकी द्वारे संपर्क साधत तात्काळ मदत पोहोचवणे होणार सोपे
कणकवली तहसीलदार कार्यालयाला देखील चार वॉकी टॉकी प्रदान
सिंधुदुर्गात निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी व आपत्ती कालावधीमध्ये जनतेला योग्य वेळी मदत पोहोचवण्यासाठी संवाद साधला जावा याकरता जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यामार्फत तालुकास्तरावर वॉकी टॉकी प्रदान करण्यात आल्या. यामध्ये कणकवली तालुक्यात चार वॉकी टॉकी देण्यात आले असून यामुळे पूरस्थिती किंवा आपत्तीच्या कालावधीमध्ये दूरध्वनी किंवा मोबाईल नेटवर्क द्वारे संपर्क तुटल्यास दोन किलोमीटरच्या अंतरापर्यंत या वॉकी टॉकी द्वारे संपर्क साधण्यासाठी उपयोग होणार आहे. उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,तहसीलदार व नायब तहसीलदार, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील शाखा प्रमुख यांना वायरलेस कम्युनिकेशन व वॉकी टॉकी हाताळण्याचे प्रशिक्षण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत प्रशिक्षक नितीन ऐनापुरे, कोल्हापूर यांनी दिले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमास श्री.अनिल पाटील, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, शुभांगी साठे, अपर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणि मच्छिंद्र सुकटे निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची विशेष उपस्थिती होती.
सदर प्रशिक्षणात वॉकी टॉकी हाताळण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. पूर, चक्रीवादळ अशा आपत्ती काळात संवाद साधण्यासाठी वॉकी टॉकी किंवा वायरलेस कम्युनिकेशन हे कसे उपयुक्त ठरते याचे मार्गदर्शन सदर प्रशिक्षणात करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमानंतर सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचे हस्ते वॉकी टॉकीचे वाटप करण्यात आले.





